आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mukt Vyaspith Sudhir Laxmikant Dani Article About Examination, Divya Marathi

निकोप परीक्षांसाठी तक्रार कक्ष हवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थिदशेतील महत्त्वाच्या असणार्‍या आणि आयुष्याला ‘वळण’ देणार्‍या बारावीच्या परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षांचेही ‘काउंटडाऊन’ सुरू झाले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या अनुषंगाने या परीक्षा कॉपीमुक्त, गैरप्रकारापासून मुक्त असणे आवश्यक आहेत. परंतु पेपर फुटण्याचे प्रमाणही वाढले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्तमान सदोष परीक्षातून विद्यार्थ्यांना कष्ट न करता गुण मिळतात, शिक्षकांच्या विषयाचे निकाल उंचावतात आणि संस्थाचालकांची कॉलर ताठ होत असल्यामुळे या गैरप्रकारातून होणार्‍या ‘कृत्रिम गुणवत्ता वाढीची’ वाच्यता होत नाही .शासनालाही आपण कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे चीज झाल्यासारखे वाटते. हा सर्व प्रकार वर्षभर अभ्यास करणार्‍या विद्यार्थी आणि मन लावून वर्षभर अध्यापन करणार्‍यावर अन्याय करणारा आहे. शिक्षणप्रेमी परीक्षांतील गैरप्रकार, अपप्रवृत्तीविरोधात ‘व्हिसल ब्लोअर’ची भूमिका बजावू इच्छितात. दुर्दैवाने आज त्यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. बोर्डाच्या ज्या हेल्पलाइन असतात त्यावर तक्रार केली असता त्यांची वर्तवणूक ‘भीक नको पण कुत्रे आवर,’ या प्रकारातील असते असा अनेकांचा अनुभव आहे. मुळात तक्रारच नोंदली नाही तर कारवाईचा प्रश्नच उरत नाही. या भूमिकेमुळे बोर्डाच्या हेल्पलाइन या परीक्षातील गैरप्रकारांबाबत तक्रार करणार्‍यांसाठी ‘हेल्पलेस’ लाइन ठरतात असा स्वानुभव आहे.