प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढवू नये, असे निवेदन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. बाळासाहेबांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. प्राध्यापकांच्याच नव्हे, तर कुठल्याही कर्मचार्यांच्या निवृत्तीचे वय वाढवण्यात येऊ नये, असे मला वाटते. बेकार पदवीधारकांचे, नेट-सेटधारक पदव्युत्तरांचे लोंढे नोकरीच्या शोधात दारोदार भटकत असताना तीस-चाळीस वर्षे नोकरी करून साठीला पोहोचलेल्या, काही अपवाद वगळता, शारीरिक व मानसिकदृष्ट्या ढेपाळलेल्या कर्मचार्यांच्या निवृत्तीचे वय वाढवण्यामागे कुठलेही सबळ कारण दिसत नाही. असलेच तर राजकीय कारण असू शकते. रिकाम्या हातांना आणि डोक्यांना योग्य वेळी योग्य काम मिळाले नाही तर तरुणाई भरकटत जाईल. समाजकंटक त्यांना वाममार्गाला लावतील. त्याची सारी जबाबदारी शासनावर आणि समाजावर असेल. याचा विचार झालेला बरा!