आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कठीण प्रसंगाचा सामना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अनुताई वाघ यांच्या विकासवाडी अध्यापक विद्यालयात डी.एड.ला शिकत होते. विद्यार्थिनीच्या वसतिगृहात राहत असतानाची गोष्ट. माझी रूममेट नंदा खोमणे हिची छाती अचानक दुखू लागली. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. छातीचे दुखणे वाढत चालल्याने ती मोठ्याने रडत होती. आमची सर्वांची तारांबळ उडाली. काय करावे काही सुचेनासे झाले. कारण तेव्हा अनुताई चार-पाच दिवसांसाठी बाहेरगावी गेल्या होत्या. मी वर्गमैत्रीण माधवीच्या मदतीने नंदाला शासकीय रुग्णालयात नेण्याचे ठरवले. शोधाशोध करून एक मिनीडोर मिळवला. त्यातून डहाणूला आलो. रात्र बरीच झालेली होती. वाहनात आम्ही तिघीच मुली होतो. रस्ता निर्मनुष्य, सर्वत्र भयानक शांतता, रातकिड्यांच्या किरकिरीने भयाण शांततेत मनात नको त्या शंकांचे वादळ उठलेले होते. कसेतरी डहाणूला पोहोचलो. तेथील डॉक्टरांना एकूण परिस्थिती सांगितली. माझ्या मैत्रिणीवर योग्य उपचार झाले. तिला श्वसनाचा त्रास होत असल्याने डॉक्टरांनी तिला चार दिवस दवाखान्यात राहण्यास सांगितले. सोबतची मैत्रीण निघून गेली होती. मी एकटीने तिची शुश्रूषा करण्यास सुरुवात केली, पण एकट्या तरुणीला पाहून येणार्‍या-जाणार्‍यांच्या नजरा विचित्र वाटत होत्या. त्यावर मात करण्यासाठी शेवटी मी खोटे मंगळसूत्र, जोडवे घातले. चार दिवसांनंतर मैत्रिणीला दवाखान्यातून सुटी मिळाली. तिला कोसबाडला परत आणले. एका मैत्रिणीचा जीव वाचवल्याचे समाधान मिळाले होते. ही घटना अनुताईंना कळली. त्यांनी प्रार्थनेच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांसमोर माझ्या धाडसाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना ही गंभीर घटना कळताच सर्वजण स्तब्ध झाले. त्याचबरोबर मी दाखवलेल्या धाडसाचेही कौतुक वाटत होते. अनुताईंनी केलेले कौतुक आजही सर्व पारितोषिकांपेक्षा श्रेष्ठ वाटते.