माझा पहिला कवितासंग्रह ‘मातरं’ हा राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने तयार केलेला होता. पहिलाच कवितासंग्रह असल्याने याचे समारंभपूर्वक प्रकाशन करण्याचे ठरले. नुकतंच शिक्षण पूर्ण झाल्याने माझ्यासह सर्व मित्र बेकार होते. कार्यक्रम मोठा करायचे ठरले पण पैशाचे काय? कवी इंद्रजित भालेराव यांनी काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली होती. त्यांनाच प्रकाशनाला बोलावयाचे ठरले. भालेराव सर मानधनाशिवाय यायला तयार झाले, पण प्रवासखर्च तरी देणे आवश्यक होते. आम्ही मित्रांनी तयारी केली. यासाठी सगळयांच्या घरच्या लोकांच्या खिशाला कात्री लागणार होती. माझ्या कवितेवर प्रेम करणारे प्रा.डॉ.शेषराव मोहिते, ज्येष्ठ कवी फ.म.शहाजिंदे, रमेश चिल्ले हे कार्यक्रमासाठी आवर्जून आले. प्रकाशन झाल्यानंतर आम्ही सर्वजण हॉलबाहेर पडलो. मी प्रवासखर्चाचे पाकीट भालेराव सरांसमोर धरले. सर हसले आणि माझ्या पाठीवर हात ठेवून ते पाकीट स्पष्टपणे नाकारलं. त्यांच्याबद्दलचा आमच्या मनातील आदर आणखी वाढला. कार्यक्रमानंतर आम्ही घरी आलो. घरातील सर्वांची ओळख झाली. तेव्हा भालेराव सर आई आणि अण्णांच्या पाया पडले आणि अतिशय नम्रपणे म्हणाले, सांभाळा आमच्या कवीला. आपल्या मुलांच्या कौतुकासाठी एवढी मोठी मंडळी आपल्या घरापर्यंत आली, याचे सर्वांनाच मोठे कौतुक होते. पाहुणे आपल्या पाया पडलेले पाहून आईच्या डोळ्यात पाणी आले. मीही हे सर्व पाहून भारावून गेलो आणि नकळत माझेही डोळे पाणावले. जवळ काही नसताना केवळ कवितांमुळे हे सगळे घडून आले. प्रकाशनाचा हा पहिला कार्यक्रम अशा वेगळेपणामुळे माझ्या कायम स्मरणात आहे. आता काहीही करण्याची तयारी आणि परिस्थिती असली तरी त्या वेळची सर आता येणार नाही. तेव्हाचा उत्साह आणि ऊर्जा आता येणार नाही. कवितेचे हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाचा स्वभाव. समाजात आदरास पात्र असलेल्या माणसांचा स्वभाव इतका नम्र असू शकतो, हे प्रथमच समजले आणि कृतकृत्य झालो.