आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना स्वातंत्र्य द्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाच्या मनात अहंपणाची भावना आली की, त्याला गर्व झाला आहे, हे समजावे. आपलेच घोडे पुढे दामटण्यात काही अर्थ नसतो. दुसर्‍याच्या विचाराला महत्त्व देणे, गरजेचे व हितकारक असते. यात आपला उत्कर्ष असला तर त्याप्रमाणे कार्य करण्यास काय हरकत आहे? एका निर्णयाच्या हट्टास माझा मित्र बळी पडला. दोन वर्षांपूर्वी त्याच्या मुलीला दहावीला 95 टक्के मार्क पडले होते. शिवाय गणित आणि संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले होते. साहजिकच आपल्या मुलीच्या गुणवत्तेचा त्या दोघांना अभिमान वाटत होता. पुढे अकरावीनंतर बारावीला जास्त गुण मिळावेत, अशी अपेक्षा असणारच. दोघेही नोकरीत असल्याने तिच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसे. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे असे बापाला वाटायचे तर आईची इच्छा इंजिनिअर होण्याची होती. ती इंजिनिअर झाली तर आपल्याला जावई चांगला मिळेल, परदेशात जाता येईल, असा आईचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी सीईटी परीक्षा देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे मुलगी शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत होती. त्याचा परिणाम निकाल लागल्यानंतर दिसला. मुलीला बारावीला 45 टक्के मार्क्स मिळाले. तीच गत सीईटीमध्ये झाली. ज्या मुलीला इंजिनिअर-डॉक्टर बनवण्याचे स्वप्न होते, तो प्रश्न निकाली निघाला होता. आपण उगाच आपल्या पाल्याबद्दल अहंपणा मिरवत होतो. तिच्या क्षमतेचा विचारच केलेला नव्हता. आपल्या धाकामुळे तिला न आवडणार्‍या विषयाकडे खेचून नेले, हे नंतर उमगले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. मुलीनेही अनेक वेळा मला गणित किंवा संस्कृतमध्ये पीएच. डी. करण्याची इच्छा आहे, हे वारंवार सांगितले होते. पण तुला त्यातले काय कळते? म्हणून गप्प केले होते. मुलांवर अशा प्रकारची जबरदस्ती करून आपण त्यांच्या आयुष्याचे मातेरे करत आहोत, याची जाणीव पालकांनी ठेवायलाच हवी. यासाठीच तज्ज्ञांकडून समुपदेशन घेणे गरजेचे असते. आताच मुलांना कोणता मार्ग निवडायचा आहे, त्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे.