‘दिव्य मराठी’ (29 जुलै) च्या मुख्य अंकातील ‘माझा महाराष्ट्र’ या पानावर प्रसिद्ध झालेली ‘महालक्ष्मीला 35 किलोची सुवर्णपालखी’ ही बातमी वाचून अतिशय खेद वाटला. आपण हिंदू आहोत, ईश्वराचे नामस्मरण करतो. पूजा करतो. देवावर श्रद्धा ठेवतो. हे सगळं ठीक आहे; पण देवालयावर असा पैसा उधळणे कोठे तरी थांबले पाहिजे. त्यापेक्षा अनाथ, अपंग, गतिमंद, अंध, मूकबधिर अशा मुलांसाठी अनेक संस्था कार्य करतात, त्यांना आर्थिक मदत केल्यास ते दान सत्पात्री तरी लागेल. कोल्हापूरमध्ये एका अपघातात अपंगत्व आलेल्या नसीमा हुरजुक या महिलेने अपंगांसाठी मोठी संस्था उभारली आहे. त्यांनाही मदत करावी. आपल्याकडे मोठमोठ्या देवस्थानांत अगणित संपत्ती आणि दागिने वर्षानुवर्षे पडून आहेत. कदाचित ही रक्कम स्विस बँकेतील काळ्या पैशापेक्षा जास्तही असेल. ही संपत्ती देशावरील कर्ज फेडण्यासाठी वापरली पाहिजे. यासाठी समाजाची मानसिकता मात्र बदलणे गरजेचे आहे.