आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांशी जुळले स्नेहबंध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्हा राहतो तिथे दुसर्‍या इमारतीचे काम चालू होते. कामगारांची लहान मुले तिथेच आवारात खेळत असत. त्या मुलांना अभ्यासाची खूप आवड होती, पण त्यांना शिकवणार कोण हा प्रश्न होताच. एकदा कामानिमित्त ओळखीच्या काकूकडे गेले होते. काकू घरात एकदम एकाकी आणि उदास होत्या. त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितले, दिवसभर घरात एकटीच असते. एकटेपणा कंटाळवाणा वाटतो. घर खायला उठते. तुझे काका तर व्यवसायानिमित्ताने दिवसभर बाहेर असतात आणि रात्रीसुद्धा उशिरा घरी येतात. दोन्ही मुले शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. त्यामुळे फार उदास असते, करमतच नाही. मग मी त्यांना त्या मुुलांना शिकवण्याविषयी विचारले. त्या काकूंनी मनावर घेतलं. दुसर्‍या दिवसापासून त्यांना शिकवण्यास सुरुवात केली. मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून खाऊसुद्धा देण्यात येऊ लागला. प्रारंभी त्यांना अक्षरओळख करून देण्यास खूप प्रयास पडले. काकूंनी जिद्दीने आणि चिकाटीने शिकवले. मुलेही मन लावून अभ्यास करू लागली होती. त्यांनाही अभ्यासात गोडी निर्माण झाली. विद्यादानासारखं पुण्याचं काम काकूंनी केलं. त्यात त्यांचाही वेळ चांगला जात होता. मुले अभ्यासाचे धडे गिरवत मोठी झाली. त्यांच्या शिकवण्यामुळे ती स्वावलंबी झाली. चांगल्या ठिकाणी कामाला लागली. त्यातील काही जण अनेक क्षेत्रांत चांगले नाव कमावत आहेत, पण काकंूना ती विसरली नाहीत. तसं पाहिलं तर ही मुले आणि काकू योगायोगाने एकत्र आली. त्यांच्या शिक्षणाचा पाया पक्का झाला. त्यासाठी काकूंनी मेहनत घेतली खरी, पण मुलंही जिद्दीने शिकली. काकूंनी सामाजिक कार्य म्हणून शिक्षणाचे धडे दिले. त्यासाठी पदरमोड केली, पण विद्यार्थ्यांच्या पालकांकडून एक छदामही घेतला नाही. अशी उदाहरणे विरळच असतात.