आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीवनात कलेचे स्थान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडिलांनी मला लहानपणापासूनच हैदराबादला डॉ. डावरे अपर प्रायमरी स्कूल या शाळेत शिकायला ठेवले. आत्याकडे घरापासून दूर राहणे मला आवडत नव्हते, पण वडिलांनी माझी कशीबशी समजूत काढली आणि मी हैदराबादला आले. वडील अभ्यास घेत असत, पण आई मला कधीच अभ्यास कर म्हणून रागावली नाही. उलट आई मला मेंदी, रांगोळी, चित्रकला, भरतकाम या गोष्टी मनापासून शिकवायची. वडील म्हणायचे, दररोज अभ्यासाकडे लक्ष दे, दुर्लक्ष करू नकोस. पण आई मला कलेचे महत्त्व सांगायची. मग मी रांगोळी, मेंदी काढण्याचा प्रयत्न करायची. मात्र मला काही जमत नव्हते. तेव्हा मी कंटाळून म्हणायचे, एवढं किचकट काम नाही जमत, लक्षात येत नाही अन् डोक्यातही राहत नाही. तेव्हा आई म्हणायची, अगं आपण शिक्षण घेतलं पाहिजे. चांगली नोकरी केली पाहिजे. पैसाही कमावला पाहिजे, पण अंगी तितकीच कलाही असली पाहिजे.
जीवनात कलेचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. कला ही साधना आहे. एक विरंगुळा म्हणून कला शिकली पाहिजे. लक्षात घेतली पाहिजे. उन्हाळ्याच्या सुटीत मला आईने रांगोळी, मेंदी काढणे अशा विविध कला शिकवल्या. त्या वेळी मला त्याचे महत्त्व कळलेच नाही. पण आता हे लक्षात आले आहे की पैशाने वस्तू विकत घेता येतात, पण कला घेता येत नाही. ती जिद्दीने शिकावी लागते. त्या वेळी आईच्या बोलण्याचा रागही यायचा, पण आता माझ्या आईचा मला अभिमान वाटतो. त्या वेळी मी आईचे ऐकले नसते तर आज मी कलेत अडाणीच असते. आज कोणत्याही सणाला दारात रांगोळी काढते किंवा मेहंदी हातावर काढते तेव्हा सर्वजण मला विचारतात, अरे व्वा! कोणी शिकवले? त्या वेळी माझं मन आनंदाने सांगतं, आईने.