आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा झाडू!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्या कॉलनीतील गोष्ट. पालिकेच्या अडाणी-अशिक्षित झाडू मारणा-या बायका साधारणत: पहाटे सहाच्या सुमारास मोठे रस्ते झाडत होत्या. पाच-सहा बायका असाव्यात. त्यांनी साधारणत: अर्धाएक किलोमीटरचा रस्ता झाडून झाला होता. त्यातील एक अशक्त बाई बहुधा आजारीच असावी, ती चक्कर येऊन पडली. लगेच एकमेकींना हाका मारत सर्वजणी तिच्याकडे धावत गेल्या. तिला रस्त्याच्या बाजूला घेत एक बंद दुकानाच्या शटरसमोर वर पत्रे लावलेल्या अंगणात झोपवले. तिला वारा घातला, पाणी पाजले आणि थोड तिला बोलते केले. तेवढ्यात दुरून कुणीतरी थोड्या वेळात चहा आणून दिला. तिला त्या चक्कर आलेल्या अशक्तपणातही तरतरी आली. तिने मला बरं वाटत नव्हतं, मात्र हजेरी बुडेल म्हणून कामावर आल्याचे सांगितले. तिच्या घरचं दैन्य इतर बायकांना माहीत होतंच. त्यामुळे इतर झाडू मारणा-या बायकांनी तिला ‘तू काळजी नको करू, तू आता घरी जा, तुझ्या वाटचं काम आम्ही करू. तू नको काळजी करू. तू इथ गप्प सावलीला आडोशाला बस. आम्ही तुझी हजेरी लावू. फक्त हजेरीच्या वेळी तू ये,’असे सांगितले . त्यानंतर पुढे आठवडाभर तिला बरे नसल्याने ती बाई फक्त कामावर यायची व बाकीच्या बायका तिच्या वाटचं रस्ता झाडायचं काम करायच्या. मात्र त्यांनी तिला मदत करून गरिबीत व अडचणीच्या प्रसंगी वेळ निभावून नेली. नाही तर तिच्या घरी आठ दिवसांचा पगार कमी मिळाला असता. हाल झाले असते. या वेळी संकटकाळी मदतीला धावून जाण्याची वृत्ती, चांगुलपण गोरगरिबातच जास्त असते हे प्रकर्षाने जाणवले.