Home »Mukt Vyaspith» Muktvyaspith Article

मानवता हाच खरा धर्म

डॉ. कुमुद धायतडक | May 09, 2012, 23:16 PM IST

  • मानवता हाच खरा धर्म

सध्याच्या परिस्थितीमध्ये जात, धर्म याचा दुरुपयोग करून समाजाचे विघटन केले जात आहे. माणसाची मन दुरावत आहेत. या पार्श्वभूमीवर माझा एक अनुभव चिंतन करण्यासारखा आहे. 6 डिसेंबर 1992 ला अयोध्या येथील वादग्रस्त ढाचा उद्ध्वस्त झाला होता. मी तेव्हा बीड येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होते. 7 तारखेला प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची तब्येत चिंताजनक होती व मला तातडीने बोलावले होते.
माझा चार वर्षांचा मुलगा दिनेश आजारी होता म्हणून त्याला बरोबर घेऊन गेले. प्रसूतिगृहाबाहेर अनेक जण चिंताग्रस्त चेह-याने माझी वाट पाहत होते. तेथे एक मुस्लिम तरुणी प्रसूतिवेदनांनी व्याकुळ झाली होती. मी तिची तपासणी करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला व तयारी करण्यासाठी निघाले. तेवढ्यात दिनेशने मम्मी म्हणत रडण्यास सुरुवात केली. मी क्षणभर स्तब्ध झाले.
तेवढ्यात त्या तरुणीची आई म्हणाली, मेमसाब, द्या मुलाला माझ्याकडे. तिने दिनेशला घेतले. मी शस्त्रक्रिया करण्यासाठी गेले. सर्व व्यवस्थित झाले म्हणून सांगण्यासाठी बाहेर आले तर तेथे माझा मुलगा त्या महिलेच्या मांडीवर शांत झोपला होता. त्या तरुणीचे नातेवाईक मला म्हणाले, मॅडम, आभारी आहोत, तुम्ही आमच्या मुलीला जीवदान दिले. खरे तर मीच त्यांची ऋणी होते. कारण उपचार करणे माझे कर्तव्य होते व त्यासाठी मला शासन पगार देत होते. पण त्या स्त्रीने माझ्या मुलाला सांभाळले ते केवळ माणुसकीखातरच ना? जात-धर्म या मानवनिर्मित कल्पना आहेत. मानवता हाच खरा धर्म आहे.

Next Article

Recommended