आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसचालकाची माणुसकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी पुण्याला शिक्षणासाठी असताना एक घटना माझ्या जीवनात अशी घडली की, त्यातून मी जर वाचलो नसतो तर हे सुंदर जग, हा संसार मी पाहिला नसता. पण परमेश्वराची असीम कृपा, मोठ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असावेत. त्याचे असे झाले की, मी नांदेडवरून पुण्यास आयटीआयच्या शिक्षणास गेलो. पुण्यात मला रुळण्यास थोडासा वेळ लागला. कारण मराठवाड्यासारख्या मागास भागातून गेल्यामुळे भाषेचाही प्रश्न होता. तेही 1962 मध्ये. तेव्हाचे पुणे आणि आताचे पुणे यात खूप फरक आहे. आता तरी प्रगतीच्या किती तरी वाटा मोकळ्या झाल्या आहेत. तेव्हा अनेक अडचणींवर मात करत शिक्षण घेत होतो. तेव्हा मला मानधन म्हणून 25 रुपये मिळत असत.

चितळे बंधूंचे जेवण 20 रुपयांत व इतर खर्च 5 रुपयांत भागत असे. औंध कॅम्पला मी राहत असे. एके दिवशी संध्याकाळी फिरायला जाताना काहीतरी चावले आहे असे वाटून मी वळून पाहिले. अंधुक प्रकाशात एक मोठा साप सरपटत जाताना दिसला. माझी भीतीने गाळण उडाली. आता आपले काही खरे नाही असे वाटले. डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली. बराच वेळ मी तसाच रस्त्यात बसून होतो. कर्मधर्मसंयोगाने ही बाब तेथून जाणार्‍या बसचालकाच्या लक्षात आली. त्याने बस थांबवून खाली उतरून पाहिले. मी बोलण्याच्या अवस्थेत नव्हतो. खुणेनेच मी त्याला सगळे सांगितले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्याने मला बसमध्ये बसवून ताबडतोब मिलिटरी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. तेथे डॉक्टरांनी तत्काळ उपचार केल्याने माझे प्राण वाचले. त्या चालकाने माणुसकी दाखवली म्हणून मी वाचलो. पण मी त्याचे आभारही मानू शकलो नाही. मी बरा झालो. मराठवाड्यासारख्या मागास भागातून जाऊनही मी आयटीआयमध्ये पहिला आलो. तो प्रसंग आठवला की मला चालकाची माणुसकी आठवते.