आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कष्टकर्‍याचा मोठेपणा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहानपणापासून मला बाजारहाट करण्याची खूप हौस. विशेषत: भाजीपाला, फळे खरेदी करणे फार आवडते. कारण त्यात आनंद मिळतो. त्यामुळे व्यक्ती माझ्यापेक्षा लहान असो की मोठी, मी त्यांच्याशी मामा - मावशी असे करत आपुलकीने बोलतो. जेव्हा एखादी ताजी भाजी स्वस्तात मिळते तेव्हा ती मी आनंदाने घेतो. साधारण: दोन वर्षांपूर्वीचा एक प्रसंग. एका शेतकरी मामाकडे बाजारात भुईमुगाच्या शेंगा घेत होतो. भावाची चौकशी केली. त्यांनी 25 रुपये किलो सांगितले. मी ग्राहक या नात्याने 20 रुपयांना मागितले. मामा माझ्याकडे पाहून म्हणाले, ‘साहेब, तुम्ही पगारदार आहात. दोन - पाच रुपयांसाठी घासाघीस कशाला करता?’ मी खजील झालो; परंतु आपल्या म्हणण्याचे समर्थन करत म्हणालो, ‘मामा, ही भुईमुगाची शेंग बोरा - चिंचासारखी झाडावर लटकते की जमिनीखाली येते हे लेकराला माहीत नाही. मला त्याला वारंवार सांगावे लागते. देवाचं आम्ही काय घोडं मारलं कोण जाणे. माझ्या तीन पिढ्यांपासून एक गुंठाही जमीन नाही.’ तेव्हा मामा म्हणाला, ‘साहेब, जमीन नाही हे काही चांगले नाही. उली - तिली तरी जमीन पाहिजे बगा.. मला देवाच्या दयेने चार - पाच एकर जमीन आहे.’ बोलता बोलता तराजूने शेंगा मोजताना त्याने अगदी झुकते म्हणजे जमिनीला टेकेल इतके माप माझ्या पिशवीत टाकले. खाली सांडलेल्या शेंगाही वेचून टाकल्या आणि लेकरं खातील, असे म्हणत फक्त वीसच रुपये घेतले. त्याचा मोठेपणा पाहून मला राहवले नाही. मी त्याच्याकडील इतर भाज्या भाव न करता घेतल्या व त्याने सांगितले तेवढे पैसे दिले. तेव्हापासून प्रत्येक आठवड्याला आमची भेट होते. त्याच्याकडील भाज्या मी चौकशी न करता घेतो. एखादी भाजी चांगली नसेल तर मामा स्वत: होऊन घेऊ नका, असे सुचवतो. कष्टकरी माणसे मनाने मोठी असतात, हेच खरे!