आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यवेक्षकांनी धाडस करावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर केंद्रावर सुमारे 16 वर्षे 12 वी बोर्ड परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले. सर्वांना विश्वासात घेऊन पेपर सुरू होण्यापूर्वी परीक्षा दालनात सर्व परीक्षार्थींची शारीरिक झडती घेतली जाई. याकामी पोलिस आणि महिला प्रतिनिधी यांचीही मदत घेतली जाई. ‘झडती पथक’ चांगल्या प्रकारे झाडाझडती घेत असे. त्या वेळी कॉप्या तर मिळतच, पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक परीक्षार्थीजवळ पैसे मोठ्या प्रमाणावर असत. आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांवरून व इतर बाहेरून येणार्‍या विद्यार्थ्यांजवळ एवढे पैसे पाहून धक्का बसला. माझ्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात पॉकेटमनी ही संकल्पना रुजलेली नव्हती. चार-दोन आणे मिळणेही मुश्कील होते. पैशांबरोबर या विद्यार्थ्यांकडे तंबाखू, गुटखा, मावा, बडीशेप यांच्याही पुड्या मोठ्या प्रमाणावर सापडत. खिशात एसटीचा पास, ओळखपत्र यांचाही समावेश असे. सध्याची तरुण पिढी वाईट वळणाला लागली, हे पाहून वैषम्य वाटत होते. यांना आयुष्यातून बरबाद होण्यापासून कसे रोखायचे? यासाठी त्यांच्याजवळचे पैसे, एसटीचा पास, ओळखपत्र त्यांच्याकडे ठेवून बाकी सर्व साहित्य जप्त केले जाई.

केंद्र संचालकाच्या खोलीत अक्षरश: ढीग लागत असे. पेपर सुटल्यावर प्राचार्यांच्या आदेशानुसार सर्व जाळून टाकले जाई. शारीरिक झडतीमध्ये आमच्या पथकाला अनेक आश्चर्यकारक धक्के बसत. एखाद्या अंतराळवीरासारखी परीक्षार्थीची शरीरे फुगलेली दिसून येत होती. यात विद्यार्थिनीही मागे नव्हत्या. बाकाच्या फटीत, भिंतीवर, पट्टीवर, शर्टाच्या बाह्यांवर, पॅडवर, तळहातावर, लिहिलेले असते. या मुलांना लपवण्याचे ठिकाण आधीच सांगून ठेवलेले असेल; परंतु हा सर्व गैरप्रकार रोखणारा घटक म्हणजे पर्यवेक्षक. ते या प्रकाराकडे दुर्लक्ष करत होते. काही शिक्षक अपवाद असतीलही; परंतु भविष्यात आपल्या मुलांचे नुकसान टाळायचे असेल तर त्याला परीक्षेला व्यवस्थित तयारी करून बसू देत चला.