आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेकी बुवांची विनम्रता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांची साधारणत: 25-30 वर्षांपूर्वी परळी-वैजनाथ येथील नटराज रंगमंदिरात उत्तररात्रीपर्यंत शास्त्रीय, नाट्यपदांची एक मैफल रंगली होती. शास्त्रीय संगीत म्हणजे आऽऽ, ऊऽऽ यापलीकडे विचार करण्याची कुवत नव्हती. पण, पहिल्या-दुसर्‍या रांगेत ज्येष्ठांसमवेत बसायला मिळते म्हणून मी कार्यक्रमास गेलो होतो. ज्येष्ठ मंडळींना बुवांच्या गाण्यांमध्ये असे काय की जे ‘व्वा... व्वा’ म्हणून दाद द्यायचे आणि टाळ्याही वाजवायचे, यावर मी विचार करायचो. पुढे शास्त्रीय संगीताची मोहिनी आणि तीही अभिषेकीबुवांसारख्यांचे गायन यातील जादू हळूहळू कळू लागली.

मैफल झाल्यानंतर माझ्या वडिलांनी बुवांकडे जेवणाचा विषय काढला. जेवण तर करायचे होते; पण त्यांच्या गायनाच्या दृष्टीने काही पथ्येही पाळावी लागतात. म्हणून थोडे अवघडल्यासारखे वाटून अतिशय विनम्रतेने त्यांनी एक अट घातली. जेवणाचे निमंत्रण स्वीकारताना त्यांनी कमी तेलातलं पिठलं (बेसन) आणि भाकरी असेल तरच जेवतो, याव्यतिरिक्त दुसरे मी पानात काही घेणार नाही, अशी ती अट घालतानाही त्यांच्या चेहर्‍यावर नम्रतेचा भाव होता. आमच्या घरी मध्यरात्री 2.30 नंतर एक पंगत बसली. अभिषेकीबुवा, त्यांचा वाद्यवृंद व इतरही काही मोजकी मंडळी होती. ती पंगत आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. माझे डोळे बड्या मंडळींच्या हालचाली साठवत होते. बुवांनी आवर्जून जेवण कुणी बनवलं याची आस्थेने विचारपूस केली. त्या स्वयंपाकगृहाकडे पाहून हलकेसे हात जोडले. त्यातून त्यांनी कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला. मिळालेल्या प्रेमाचा आदरपूर्वक स्वीकार करताना कुठेही त्यांच्यातील एक मोठा गायक असल्याचा आव-भाव नव्हता. पुढे वयाने कळता झाल्यावर बुवांचे मोठेपण समजल्यानंतर आणखीनच त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला. बुवा आज हयात नाहीत; पण आठवण एक अमूल्य ठेवा झाली आहे. अनेक मोठे लोक महान ठरतात ते त्यांच्यातील विनम्रतेने.