Home | Mukt Vyaspith | muktvyaspith article

डॉ. आंबेडकर विद्यापीठ की हिंदुत्ववादी विद्यापीठ ?

आनंद दाभाडे | Update - Feb 23, 2016, 03:00 AM IST

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सुमारे पन्नास एकर जागेवर ३०० कोटी रुपये खर्चून गोपीनाथ मुंडे यांच्या नावे एक संशोधन संस्था उभारण्याचे घाटत आहे.

  • muktvyaspith article
    डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सुमारे पन्नास एकर जागेवर ३०० कोटी रुपये खर्चून गोपीनाथ मुंडे यांच्या नावे एक संशोधन संस्था उभारण्याचे घाटत आहे. या संदर्भातील एक प्रस्ताव विद्यापीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्याचे वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहे. गोपीनाथ मुंडे मराठवाड्याचे भूमिपुत्र होते म्हणून त्यांचे स्मारक उभारण्यात काहीही गैर नाही, पण औरंगाबाद शहरात सरकारी जागेवर गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक होऊ घातले असताना विद्यापीठातील पन्नास एकर जागेवर गोपीनाथ मुंडेंचे दुसरे स्मारक विद्यापीठ कशाकरिता उभारत आहे? केंद्रात भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर हिंदुत्ववाद्यांची धर्मांध कारस्थाने एकीकडे मूळ धरीत असताना ज्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर लोकशाही धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला त्यांच्याच नावे असलेल्या विद्यापीठात हिंदुत्ववादी धर्मांध शक्तीचा अड्डा तयार करण्यात कुलगुरू बी. ए. चोपडे हे का पुढाकार घेत आहेत? देशभरातील विद्यापीठातून संघ परिवाराची शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने धुमाकूळ घातला आहे.

    हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्यास भाजप व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कुटिल कारस्थानास बळी पडून आत्महत्या करावी लागली. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डावी चळवळ संपवण्याची कारस्थाने रचली जात आहेत. अशा वेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास संघ परिवाराचा अड्डा करण्याचे घाटत आहे. खरे तर विद्यापीठास नामांतर चळवळीचा एक गौरवशाली इतिहास आहे. नामांतर चळवळीसाठी अनेकांनी बलिदान दिले आहे, पण त्यांचे स्मारक विद्यापीठात उभे राहत नाही. लोककवी वामनदादा कर्डक यांना मरणोत्तर डी. लिट. द्यावी, ही आंबेडकरवाद्यांची मागणी विद्यापीठ नाकारत आले. वामनदादा कर्डक यांच्या नावे लोकगीतांचे संशोधन करणारे अध्यासन नेमले जावे, ही मागणीही विद्यापीठ नाकारत आले. पण याच वेळी गोपीनाथ मुंडेंच्या नावे विद्यापीठात संशोधन केंद्र स्थापन करून हिंदुत्ववाद्यांचा विद्यापीठात शिरकाव व्हावा, असे वातावरण विद्यापीठ तयार करीत आहे. या सर्वच प्रकरणांचा परिवर्तनवाद्यांनी व विद्यापीठाने पुनर्विचार करावा असे वाटते.

    आनंद दाभाडे, औरंगाबाद

Trending