आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुजींनाच कळवळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमचे पैठण तालुक्यातील ढाकेफळ नावाचे खेडेगाव. तेथे मी तुकाराम हायस्कूलमध्ये 7 वीत शिकत होतो. घरची परिस्थिती फार गरिबीची होती. आईवडील, भाऊबहीण गावातच मोलमजुरी करत. एक मोठा भाऊ औरंगाबादला दरमहा 160 रुपये पगारावर रेल्वेस्टेशन परिसरातील एका लॉजवर काम करत होता. खेडेगावातील वातावरणात असूनही वर्गात हुशार होतो व माझी चित्रकला फार चांगली होती. 7 व्या इयत्तेत असताना चित्रकलेची एलिमेंटरी परीक्षा पास झालो होतो. आठवी वर्गात शिकत असताना चित्रकलेच्या पुढच्या परीक्षेची म्हणजेच इंटरमिजिएटची माहिती शाळेत आली. वर्गात शिक्षकांनी त्या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जाहीर केली. मी घरी गेल्यानंतर परीक्षेच्या फीस व तारखांबद्दल आई-वडिलांना माहिती दिली. त्या वेळेस परीक्षा फीस 7 रुपये होती.

वडील म्हणाले, 4 - 5 दिवसांनी देतो, परंतु परीक्षा फीस भरण्याचा शेवटचा दिवस उजाडला तरी घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे वडील मला पैसे देऊ शकले नाहीत. शेवटी आमच्या चित्रकलेच्या शिक्षकांनी मला बोलावले व म्हणाले, तू चित्रकलेमध्ये खूप हुशार असून फीस का नाही भरत? तेव्हा मी त्यांना खरी हकीगत सांगितली व वर्गामध्ये जाऊन बसलो.

शाळा सुटल्यानंतर घरी गेलो व रडत बसलो, कारण मी परीक्षेला मुकलो होतो; परंतु पुन्हा आमच्या गरिबीचा विचार मनात आला व मनाला समजावले की, पुढच्या वर्षी परीक्षा देईन. काही दिवसांनंतर परीक्षेचे हॉल तिकीट आले व त्यामध्ये माझेसुद्धा हॉल तिकीट पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो. वाटले, मी स्वप्न तर नाही ना पाहत? पण मला नंतर समजले की, माझ्या चित्रकलेच्या शिक्षकांनी माझी 7 रुपये फीस भरली होती व त्यांनी आमची गरिबी वाटून घेतली. खर्‍या गुरूचे कर्तव्य त्यांनी पार पाडले होते, तेही कुणालाही काही न सांगता. या आयुष्यात तरी माझ्या गुरूंना विसरणे कधीही शक्य नाही.