आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या 27 जानेवारीपासून मुंबई @24x7, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडीचा निर्णय रद्द, तान्हाजी करमुक्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई आता २४ तास सुरू राहाणार आहे. मंत्रिमंडळाने बुधवारी मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्यास मंजुरी दिली असून २७ जानेवारीपासून याची अंमलबजावणी होईल. यातून पब आणि बारना वगळण्यात आले असून त्यांना पूर्वीप्रमाणेच रात्री दीडपर्यंतच व्यवसाय करता येईल.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत निर्णयाची माहिती दिली. ठाकरे म्हणाले, मुंबईत रात्री येणारे पर्यटक व रात्रपाळी करणाऱ्यांच्या सोयीसाठी मुंबईतील नाइट लाइफ सुरू करणे आवश्यक होते. आणि आज मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. अनिवासी जागांमधील मॉल, मिल कपाउंडमधील दुकाने, हॉटेल्स आणि चित्रपटगृहे आता २४ तास सुरु राहतील. आता रात्री पोलिसांना गस्त घालावी लागणार नसल्याने त्यांच्यावरील ताण कमी होणार आहे. नाईटलाईफने महसूल वाढेल.

एफडीएला हवेत ३०० कर्मचारी : सरकारने नाईटलाईफला परवानगी दिल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाला रात्रपाळीसाठी ३०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार असल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. यासाठी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मागणी केली असून पहिल्या टप्प्यात १५० कर्मचारी भरण्याची मंजुरीची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.

हा निर्णय म्हणजे मुंबईसाठी किलिंग लाइफ

हा निर्णय नाईट लाईफ नसून तो मुंबईकरांसाठी किलिंग लाईफ आहे, तसेच कमला मिल मधील एफएसआय घोटाळ्याला पर्यटनाच्या नावाखाली नियमित करण्याचा हा डाव आहे. आयटी पार्कच्या नावाने ४ एफएसआय घेऊन प्रत्यक्षात १० एफएसआय वापरला. - आशिष शेलार,भाजप नेते

दारूची संस्कृती फोफावेल

भाजपने सुरुवातीपासूनच नाईट लाईफला विरोध केला आहे. नाईट लाईफमुळे मुंबईत दारू पिण्याची संस्कृती फोफावेल. त्यामुळे निर्भयासारख्या प्रकरणांत वाढ होईल. - राज पुरोहित, भाजप नेते
 

मुंबईत नाइट लाइफ; मंत्रिमंडळ बैठकीत भाजपचे निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द

कृ.उ.बाजार समिती : निवडणुकीत सहकारी संस्थांतून सदस्य निवडणार

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी २०१७ मध्ये केलेली सुधारणा रद्द करून पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्य निवड करण्यास बैठकीत मान्यता.

  • तर्क : बाजार समित्यांतील भाजपचा शिरकाव थांबवण्यासाठी हा निर्णय.

नगराध्यक्षाची निवड : आता थेट जनतेतून नव्हे, नगरसेवकांतून होणार

नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

  • तर्क : भाजपने घेतलेला निर्णय रद्द करून शह देण्याचा प्रयत्न

नाग नदीचे प्रदूषण : रोखण्यासाठी प्रकल्पाच्या खर्चास शासनातर्फे हमी

नाग नदी प्रदूषण रोखण्याच्या प्रकल्पासाठी आवश्यक निधीच्या कर्जफेडीसाठी राज्य शासनाच्या हिश्श्याच्या रकमेस हमी तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणी आणि संनियंत्रणासाठी समन्वय समिती नियुक्त करण्यात येणार आहे.

  • तर्क : भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचे स्थान पक्के करण्यासाठी

'तान्हाजी' करमुक्त 

'तान्हाजी -द अनसंग वॉरिअर 8 या चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून सवलत देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. ३० एप्रिल २०२० पर्यंत ही सवलत लागू.

पुण्यात आफ्टरनून लाइफ.... 

पुण्यात नाइट लाइफ सुरू करणार का, या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी 'पुण्यात अगोदर आफ्टरनून लाइफ सुरू करुया, अशी मिश्कील टिप्पणी केली.'