दिव्य मराठी हस्तक्षेप : या देशद्रोही कसाबांना कोणती शिक्षा द्यायची?

मुंबईवर हल्ला करणारा नराधम अजमल कसाब अकरा वर्षांपूर्वी ज्या पुलावरून पळून गेला होता, तोच पूल कोसळला आणि सहा जण जिवाला मुकले.

Mar 16,2019 09:42:00 AM IST

मुंबईवर हल्ला करणारा नराधम अजमल कसाब अकरा वर्षांपूर्वी ज्या पुलावरून पळून गेला होता, तोच पूल कोसळला आणि सहा जण जिवाला मुकले. निरपराधांचे बळी घेणारा कसाब फासावर लटकला तरीही हे खून ज्यांनी केले त्यांचे काय करायचे?


हे खून यांनी आज नाहीत केलेले. गेली अनेक वर्षे हेच तर सुरू आहे. मुंबईसारख्या महानगरात आणि मायानगरीत जे घडते आहे, त्यामुळे आपण मध्ययुगात आहोत की काय, असे भय वाटू लागले आहे. गेल्या दीड वर्षातली ही तिसरी दुर्घटना. अंधेरीत ब्रिज कोसळतो, एल्फिन्स्टन स्टेशनवर पूल कोसळल्याच्या अफवेने चेंगराचेंगरी होते आणि २३ माणसं मृत्युमुखी पडतात. त्यापूर्वी महाडजवळ सावित्रीचा पूल कोसळतो. मेलेल्या माणसांचे मृतदेहही सापडत नाहीत. मृतांच्या नातेवाइकांचा हुंदका आभाळ व्यापून उरतो आणि जिल्ह्याचा पालकमंत्री गुटख्यासोबत जबाबदारीही थुंकतो. माणसं किडामुंगीसारखी मरतात. कधी लोकलमधून पडून, कधी आगीत भस्मसात होतात. मुंबईत आलेल्या पुरानंतर मॅनहोलमध्ये पडून जागतिक दर्जाचा आमचा संशोधक मरतो. दुसरीकडं स्मार्ट सिटीच्या घोषणांनी आसमंत दुमदुमत असतो. अवघी मुंबई इथं टाचा घासून मरत असते आणि मुंबई आमची कशी, हे सिद्ध करण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असतो.

यांना खिसा खुणावतो मुंबईचा, पण या मुंबईला हृदय आहे, मन आहे याचा मात्र विसर पडतो. परप्रांतीयांना विरोध करण्याचे राजकारण करणाऱ्यांना मुंबईवर हक्क सांगण्याचा अधिकार तो किती? मुंबई आज जी आहे, त्यात वाटा मुख्यत्वे भूगोलाचा आणि मग अर्थातच इंग्रजांचा. भारताचे गेट असलेले मुंबई परप्रांतीयांसाठी बंद करण्याचे राजकारण करणे सोपे आहे, पण या शहरासाठी तुम्ही केले काय, याचे उत्तर देणे मात्र अवघड. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या उरावर बसलेले हे सत्ताधारी. निकालानंतर भाजपने मुंबई आंदण देऊन टाकली शिवसेनेला. सत्तेतला 'वाटा' मागणार नाही, तर आम्ही 'चौकीदार' असू, असेही भाजपने जाहीर केले. पण सगळीकडचेच चौकीदार चोर निघाल्यावर सामान्य माणसाने पाहायचे कोणाकडे? जी महानगरपालिका जिंकण्यासाठी तुम्ही अब्जावधी रुपये पाण्यात घातले, त्या महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेला पूल कोसळतो. त्यानंतर जखमींची अथवा मृतांच्या नातेवाइकांची चौकशी करावी, असेही 'सामना'वीरांना वाटत नाही. रणधुमाळीत रमलेल्या आणि स्वतःच्या पोराबाळांची, नातवंडांची सोय लावण्यात मग्न असलेल्या विरोधकांनाही इतरांच्या लेकरांचे काही पडलेले नसते!


महानगरपालिका जिंकण्यासाठी एकमेकांच्या उरावर बसलेल्या पक्षांना आज काहीच बोलायचे नाही. यांना 'स्ट्रक्चरल ऑडिट'विषयी भलेही काही करायचे नसेल, पण या नेत्यांचे ऑडिट करण्याची वेळ आता आली आहे. अशा घटना घडल्या की नातेवाईक आणि जखमींना मदत दिली जाते, पण हे खून ज्यांनी केले त्यांना काहीच होत नाही. एल्फिन्स्टन दुर्घटनेतील दोषींवर कोणती कारवाई झाली? सावित्रीच्या उदरात जे गडप झाले त्यांना कोणता न्याय मिळाला? कंत्राटदार गलेलठ्ठ होताहेत आणि अधिकाऱ्यांची मालमत्ता वाढतच चालली आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीत उधळण्यासाठी करोडो रुपये पक्षांकडे येतात. मुलं पळवणारी टोळी आल्याची वावडी उठते. नेत्यांची जुगलबंदी रंगते. कालची आश्वासनं आज हवेत विरतात. आदर्शवादाच्या पोकळ गप्पा सारे विसरतात. देशभक्तीची प्रमाणपत्रं मागितली जातात. सैनिकांच्या हौतात्म्याचंही राजकारण केलं जातं. पाकिस्तानविरुद्ध लढण्यासाठी बाहू फुरफुरू लागतात. माध्यमांच्या इंजेक्शननं भूल दिली जाते. आणि सगळं सगळं विसरून या लोकशाहीच्या गरब्यात सगळ्यांनी बेभान होऊन नाचावं, अशी मोर्चेबांधणी आखली जाते. कोसळलेल्या पुलाखाली बारा वर्षांचं लेकरू निपचित पडतं. लेकराच्या ओढीनं घराकडं निघालेल्या झहिरा किंवा रंजनासारख्या हिरकणी आपला जीव गमावतात, त्याची कुणालाच काही तमा नसते. पुलाखालून एवढं पाणी वाहून जातं की पूल कोसळूनदेखील पाण्यावर साधा तरंगही नसतो.


निवडणुकीची रणधुमाळी सवंग स्तरावर नेणाऱ्या राजकीय नेत्यांच्या या संवेदनशून्य उन्मादाचा निषेध म्हणून आम्ही आज पान एकवर निवडणूक रणधुमाळीची एकही बातमी घेतलेली नाही. ज्या रणधुमाळीत सर्वसामान्य माणूस मागच्या बाकांवर असतो, तो टाचा घासून मेला आणि धायमोकलून रडला तरी मस्तवाल नेत्यांना काहीच फरक पडत नाही, त्या रणधुमाळीलाच आज आम्ही मागच्या बाकांवर बसवत आहोत. सामान्य माणूस हाच या लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. तोच आमचाही केंद्रबिंदू आहे. या सामान्य माणसासोबत आम्ही उभे आहोत, हेच आम्हाला आज अधोरेखित करायचे आहे.

संजय आवटे
संपादक

X