आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थव्यस्थेला दिशा दाखवणारे मुंबई, महाराष्ट्रच गंभीर संकटात : डॉ. सिंग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दाखवणारी मुंबई व महाराष्ट्र आज गंभीर आर्थिक संकटात सापडला असून राज्यातील उद्योजकांमध्ये नैराश्य पसरले आहे. पाच वर्षांत सर्वाधिक उद्योग महाराष्ट्रात बंद झाले असून केंद्र व राज्य सरकारची धोरणे त्यास पूर्णपणे जबाबदार आहेत, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी व फडणवीस सरकारवर केली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने डाॅ. मनमोहन सिंग गुरुवारी मुंबईत आले होते. चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियमच्या लाँजमध्ये त्यांनी पत्रकार, पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेचे खातेदार, अर्थशास्त्रज्ञ, उद्योजक आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. 

सिंग म्हणाले, युपीएच्या काळात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. शेतकऱ्यांची कर्जे माफ करून त्यांना दिलासा दिला. मात्र, सध्याच्या सरकारच्या उदासीनतेमुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे देशाचे भविष्य अंधारात गेले आहे. देशाचे ऑटो हब असलेल्या पुण्यावरही मंदीचे मळभ आहेत. देश व महाराष्ट्रातील आर्थिक संकटावर उपाय शोधण्यात केंद्र व राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहेत. प्रत्येक समस्येसाठी विरोधकांना दोष देणे एवढाच उद्योग मोदी व फडणवीस सरकार करत आहेत, असेही ते म्हणाले. २०२४ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी आर्थिक वृद्धीचा दर १०-१२ टक्के असायला पाहिजे. मात्र, महाराष्ट्राचा उत्पादन वाढीचा दर सलग चार वर्षांपासून घसरत आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र व मुंबईतील सर्वाधिक कारखाने बंद पडले आहेत. गेल्या पाच वर्षांत चीनमधून आयात वाढली असून १ लाख २२ हजार कोटी रुपयांची रसायने, खते, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात झाली असल्याचे ते म्हणाले. 

महागाई नियंत्रणासाठी शेतकऱ्यांचा बळी 
गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आज शेतकरी आत्महत्यांसाठी प्रथम क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न करण्याचे मोदी सरकारने आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या समस्या संपत नाहीत. कर्जाचा विळखा आणि कमी उत्पन्न यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 

कर आकारणीची लोकांना शिक्षा
पेट्रोलियम उत्पादनांवर महाराष्ट्रात सर्वाधिक व्हॅट आहे. अतिरेकी कर आकारणीच्या मोदी सरकारच्या निर्णयामुळे, तसेच उच्च व्हॅट व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किमती कमी असूनही लोकांना मात्र मोठी शिक्षा होत आहे, असे मनमोहन सिंग म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वात राज्यात बरीच प्रगती झाली. आज महाराष्ट्रासमोरील अनेक समस्या या मानवनिर्मित आहेत. त्याचे निराकरण सर्वसमावेशक व कल्याणकारी धोरणांनी होऊ शकते. जर आपल्याला फायदेशीर रोजगार, शेतकरी कल्याण आणि सर्वांचे जीवनमान सुधारावेसे वाटत असेल तर यापूर्वी केलेल्या उपाययोजनांकडे परत जाण्याची गरज आहे, असे डाॅ. सिंग म्हणाले.

औरंगाबादसह राज्यातील उद्योग क्षेत्राला फटका
भारतातील सर्वात मोठे ऑटो उत्पादन क्षेत्र पुणे येथे आहे. या ऑटो हबमध्ये सध्या अंधार आहे. महाराष्ट्रातील नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती येथील उद्योग-व्यवसायांना अशाच प्रकारच्या संकटांचा सामान करावा लागत आहे. सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे मागणी व उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शेकडो उद्योगांना बंदचा सामना करावा लागल्याचे मनमोहन सिंग म्हणाले. महाराष्ट्रात उद्योग व व्यवसायाला पूरक वातावरण होते. त्यामुळे टॅलेंट व गुंतवणूक महाराष्ट्रात आकर्षित होत होती. पण, आज प्रगत महाराष्ट्रात संधीचा अभाव आहे. महाराष्ट्राच्या शहरी भागातला प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगार आहे. सुशिक्षित व्यक्तींना वाढत्या बेरोजगारीचा सामना करावा लागत असून तरुण पुरुष आणि स्त्रिया कमी पगाराच्या नोकऱ्या स्वीकारत आहेत. गुंतवणूकदार इतर राज्यांना पसंती देत आहेत. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातून लोक स्थलांतरीत होत आहेत, असे ते म्हणाले.