मुंबईने चेन्नईला रोखले; ३७ धावांनी केला सत्रातील पहिला पराभव

वृत्तसंस्था

Apr 04,2019 09:11:00 AM IST

मुंबई - अखेरच्या दोन षटकांत हार्दिक पांड्याने (२५*) केलेली फटकेबाजी आणि त्यानंतर गोलंदाजीतील (३ बळी) कमाल कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १२ व्या सत्रात चेन्नई सुपर किंग्जवर ३७ धावांनी मात केली. हार्दिक पांड्या सामनावीर ठरला.


प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७० धावा उभारल्या. प्रत्युत्तरात चेन्नई २० षटकांत ८ बाद १३३ धावा करू शकला. मुंबईकडून डी कॉक अवघ्या ४ धावांवर परतला. दुसरा सलामीवीर कर्णधार रोहित शर्मादेखील (१३) मोठी खेळी करू शकला नाही. सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने ४३ चेंडूंत ८ चौकार व एक षटकार खेचत ५९ धावा ठोकल्या. अनुभवी युवराज सिंग (४) पुन्हा अपयशी ठरला. कृणाल पांड्याने ३२ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ४२ धावा जोडल्या. चेन्नईच्या चहर, मोहित शर्मा, इम्रान ताहिर, रवींद्र जडेजा व ब्राव्हो यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

अखेरच्या २ षटकांत ४५ धावा
मुंबईच्या हार्दिक पांड्या आणि केराॅन पोलार्ड यांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी करत तब्बल २९ धावा व १९ व्या षटकांत १६ धावा वसूल केल्या. या जोडीने ब्राव्होची गोलंदाजी फोडून काढली. पांड्या आणि पोलार्ड जोडीने सहाव्या गड्यासाठी १३ चेंडूंत नाबाद ४५ धावांची भागीदारी रचत संघाला दीडशे धावांचा टप्पा गाठून दिला. पांड्याने ८ चेंडूंचा सामना करताना १ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार खेचत नाबाद २५ धावा ठोकल्या. पोलार्डने ७ चेंडूंत २ षटकारांच्या मदतीने नाबाद १७ धावा काढल्या.

X
COMMENT