IPL 2019 / तीन वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स पाचव्यांदा अंतिम फेरीत; गतविजेत्या चेन्नईला पुन्हा फायनलची संधी

सुर्यकुमारचा झंझावात; मुंबई इंडियन्स संघाची चेन्नईवर ६ गड्यांनी मात

वृत्तसंस्था

May 08,2019 08:32:00 AM IST

चेन्नई - तीन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाने मंगळवारी यंदाच्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली. या संघाने आपल्या करिअरमध्ये पाचव्यांदा आयपीएलची फायनल गाठली आहे. सामनावीर सूर्यकुमारच्या (नाबाद ७१) झंझावाती अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने क्वालिफायर सामन्यात यजमान चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. मुंबई संघाने १८.३ षटकांत ६ गड्यांनी सामना जिंकला. यासह मुंबईने दिमाखदारपणे अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे गत चॅम्पियन आणि यजमान चेन्नई संघाला मुंबईकडून घरच्या मैदानावर सलग पाचवा पराभव पत्करावा लागला. आता चेन्नई संघाला शुक्रवारी पुन्हा फायनलमधील प्रवेशाची संधी आहे.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपरकिंग्ज संघाने ४ बाद १३१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात मुंबई संघाने चार गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून आणली. मुंबईच्या विजयासाठी सूर्यकुमार यादवने झंझावाती नाबाद अर्धशतक झळकावले. त्याला हार्दिक पांड्याची माेलाची साथ मिळाली. या दाेघांनी नाबाद खेळी करत विजयी पताका फडकावली. या सामन्यात मुंबईचा कर्णधार राेहित शर्मा (४) आणि क्विंटन डिकाॅक (८) हे दाेन्ही स्वस्तात बाद झाले. मात्र, त्यानंतर सूर्यकुमारने संघाचा डाव सावरला. त्याने ५४ चेंडूंचा सामना करताना नाबाद ७१ धावा काढल्या. यात १० चाैकारांचा समावेश आहे

चेन्नई शुक्रवारी मैदानावर : गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघाला अंतिम फेरी गाठण्याची पुन्हा एक संधी आहे. यासाठी चेन्नईला १० मे, शुक्रवारी दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यात खेळावे लागेल. या वेळी चेन्नईसमाेर हैदराबाद- दिल्ली यांच्यातील विजेता संघ असणार आहे. .

X
COMMENT