सातारा / साताऱ्यात कबड्डी स्पर्धेसाठी आलेल्या मुंबईच्या खेळाडूचा विहीरीत बुडून मृत्यू

साथीदारांनाही पोहता येत नसल्याने खेळाडूला वाचवता आले नाही
 

Sep 10,2019 04:54:00 PM IST

सातारा - सातारा जिल्ह्यातील नरवणे (ता. माण) येथे गणेशोत्सवादरम्यान भरवण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई येथील कबड्डी संघातून आलेल्या युवकाचा आज सकाळी विहिरीत बुडून मृत्यू झाला.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, अविनाश अनंत शिंदे (वय १७) रा. इंदिरानगर, घाटकोपर, मुंबई हा युवक आपल्या कबड्डी संघासोबत नरवणे ता. माण येथे गणेशोत्सवादरम्यान भरवण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत भाग घेण्यासाठी आला होता. आज सकाळी अविनाश हा आपल्या सहकार्‍यांसमवेत नरवणे येथील कॅनॉलमध्ये अंघोळीसाठी गेला होता. परंतू कॅनॉलमधील पाणी गढूळ असल्याने तो सहकार्‍यांसह बाजुलाच असणार्‍या विहिरीत अंघोळीसाठी गेला असता तो पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्याबरोबर असणार्‍या सहकार्‍यांनाही याबाबत लवकर काही समजले नाही. परंतू अविनाश पाण्यात बुडाल्याचे लक्षात येताच त्याच्यासोबतच्या खेळाडूंनी मदतीसाठी टाहो फोडला. परंतू त्यांच्यापैकी कोणालाच पोहता येत नसल्याने अविनाशला वाचवता आले नाही. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेवून विहिरीतून अविनाशचा मृतदेह बाहेर काढला. पंचनामा झाल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याबाबतची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली आहे.

X