आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील सुपर डान्सरचा शोध घेणा-या ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक, नृत्यासह त्यांच्यात असलेले छुपे टॅलेंट, प्रोत्साहित आणि कौतुक करणारे जजेस यांसारख्या ब-याच गोष्टींमुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अंतिम फेरीत कोण पोहचणार, कोण बाजी मारणार यावर सर्वांचं लक्ष नक्कीच असेल. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून या मंचावरील छोट्या मुलांमध्ये असलेला उत्साह पाहून मन आनंदी होतं. डान्समध्ये सर्वच अव्वल आहेत आणि त्यांचे कौशल्य जजेससह या मंचावर आलेल्या पाहुणे कलाकारांनी पण अनुभवलंय.
नुकताच, ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर ‘मुंबई पुणे मुंबई 3’ची जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची उपस्थिती आणि जज अमृता खानविलकरच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने या आठवड्यात प्रेक्षकांना स्पेशल एपिसोड पाहायला मिळणार आहे. सर्व स्पर्धकांनी मिळून अमृता खानविलकरसाठी ‘हॅप्पी बर्थ डे’ गाणं गाऊन धमाल-मस्तीत तिला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केक कटींग झाले आणि प्रत्येक स्पर्धकांनी त्यांच्या फेव्हरेट अमृता ताईला वाढदिवसाच्या स्पेशल भेटवस्तू देखील दिल्या. अशाप्रकारे अमृता खानविलकरचा वाढदिवस थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
‘मुंबई पुणे मुंबई 3’च्या प्रमोशनसाठी आलेल्या स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यासोबत स्पर्धकांच्या गप्पा-गोष्टी रंगल्या. या कार्यक्रमातील जज सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई 3’ सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यासोबत चित्रपटातील काही किस्से देखील या मंचावर प्रेक्षकांना जाणून घ्यायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, आपल्या सर्व सुपर डान्सर्स स्वप्नील आणि मुक्ताच्या गाण्यांवर परफॉर्मन्स करणार आहेत, त्यामुळे त्यांना मिळणारी दाद पण नक्कीच विशेष असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.