आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर हल्ल्यासाठी हॅकर्सच्या रडारवर मुंबई, पुणे; स्मार्टफाेनची सुरक्षा रामभराेसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल व्यवहार, स्मार्टफाेनचा वापर माेठ्या प्रमाणात वाढत असून अत्याधुनिक लॅपटाॅप, माेबाइल, संगणक, आयपॅड या गाेष्टींचा सर्रास वापर नागरिकांकडून होत आहे. मात्र, संबंधित गाेष्टी वापरताना सुरक्षेच्या उपाययाेजना अवलंबण्याकडे दुर्लक्ष केल्याने महत्त्वपूर्ण डाटा हॅक करणे, वैयक्तिक माहिती चाेरी करणे, बँकेची माहिती चाेरणे, बदनामी करणे, आक्षेपार्ह मजकूर-फाेटाे व्हायरल करणे, खंडणी मागणे असे गुन्ह्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करत असलेल्या क्विक हील कंपनीच्या वार्षिक सायबर धाेका अहवालात मुंबर्इनंतर पुणे शहर सायबर गुन्हे हल्ल्यात देशात वेगाने अग्रस्थानी वाटचाल करत असून हॅकर्सच्या रडारवर ते असल्याचा निष्कर्ष समाेर आला आहे. 


दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, नवी दिल्ली, हैदराबाद, जयपूर या शहरांतही सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. देशात महाराष्ट्र, दिल्ली व पश्चिम बंगाल येथेही सर्वाधिक सायबर गुन्हे घडत असून कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात या राज्यांतही माेठ्या संख्येने सायबर हल्ले हाेत असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. 


एकापाठाेपाठ एक माेठी शहरे हॅकर्सच्या रडारवर येत असून मेट्राेपॉलिटन शहरे साेडून छाेटी शहरेही सायबर हल्ल्यांना बळी पडत आहेत. त्यावर वेळीच उपाययाेजना हाेणे आवश्यक बनले आहे. गेल्या वर्षभरात लॅपटाॅप व डेस्कटाॅपवर ९७ काेटी ३० लाख मालवेअर हल्ले झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून रॅन्समवेअर, क्रिप्टाे मायनर्स आणि बँकिंग  ट्राेजनसारखे धाेके गंभीर बनत चालले असून संगणक यंत्रणांवर अधिक प्रगत हल्ले करण्याची क्षमता हॅकर्सने अवलंबलेली दिसत आहे. गाेपनीय महत्त्वपूर्ण माहिती, बँक-कंपन्यांचा डाटा चाेरी, आॅनलाइन व्यवहार फसवणूक या माध्यमातून सायबर गुन्हे करणाऱ्या टाेळ्या नवनवीन लाेकांना लक्ष्य करत आहेत. दर दिवशी सुमारे दाेन ते तीन लाख प्रकारचे मालवेअर हल्ले हाेत असून प्रत्येक मिनिटाला अंदाजे १८०० मालवेअर हल्ले हाेत असल्याने त्या प्रमाणात सुरक्षेची काळजी घेण्यात न आल्याने किंवा अँटिव्हायरसचा वापर न केल्याने अनेक लाेक सायबर गुन्ह्यांना बळी पडताना दिसून येत आहेत. 


स्मार्टफाेनची सुरक्षा रामभराेसे

क्विक हीलचे संचालक संजय काटकर म्हणाले, भारतात स्मार्टफाेन वापरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने सायबर गुन्हेगारांनी माेबाइल फाेन हॅक करणे, साेशल नेटवर्किंग खात्याचा चुकीचा वापर करणे, हिडन अॅप्लिकेशन माेबाइलवर प्रस्थापित करणे, बनावट अॅप प्ले स्टाेअरवर ठेवणे, चुकीच्या पीडीएफ फाइल्स पाठवून सिस्टीम ताब्यात घेणे अशा पद्धतीचा वापर सायबर गुन्ह्यांसाठी केला जात आहे. स्मार्टफाेन वापरणारे सुमारे ९५ टक्के लाेक अँटिव्हायरस किंवा सायबर सुरक्षा वापरत नसल्याने ते हॅकर्सना लगेच बळी ठरतात. ही सुरक्षा रामभरोसे आहे. 

बातम्या आणखी आहेत...