आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका दिवसात पावसाचे 40 बळी, ‘26' जुलै’ नंतरचा सर्वाधिक पाऊस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची मंगळवारी मुसळधार पावसाने प्रचंड दैना झाली. जागोजाग तुंबलेले रस्ते आणि जलमय झालेल्या रेल्वेमार्गामुळे जनजीवनच ठप्प झाले. अनेक रस्त्यांवर गुडघाभर, तर काही भागांंत यापेक्षा अधिक पाणी साठले आणि मुंबई पालिका प्रशासनाच्या आपत्ती निवारणासाठी केलेल्या नियोजनाचे पितळ पुरते उघडे पडले. या मुसळधार पावसात मालाडमध्ये संरक्षक भिंत कोसळल्याने भिंतीखाली असलेल्या झोपडपट्टीतील २२ जणांना प्राण गमवावे लागले. कल्याणमध्ये मुसळधार पावसात नॅशनल उर्दू स्कूलची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. मालाडमध्येच पाण्यात अडकलेल्या एका कारमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू झाला. 


दुसरीकडे राज्याच्या काही भागात पावसाचा जोर मंगळवारी कायम होता. यात पुणे, नाशिक व ठाणे जिल्ह्यासह इतर भागात विविध घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. पुण्यात कोंढवा भागात सिंहगड इन्स्टिट्यूटची संरक्षक भिंत कोसळून ६ मजुरांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये चौघांना तर राज्याच्या इतर भागांत चार जणांना प्राण गमवावे लागले.  मालाड, पुणे, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांत पावसाने ४० बळी घेतले, तर ८० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. मुंबईत रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. तर अनेक ठिकाणी इमारतीत पाणी घुसले. विमान धावपट्टीवरून घसरल्याने मुंबई विमानतळावरून २०३ उड्डाणे रद्द करण्यात आली आणि ३५० उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली.


सिंहगड इन्स्टिट्यूटची भिंत कोसळून मजुरांचा मृत्यू
पुणे । कोंढवा येथे संरक्षक भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आंबेगाव बुद्रुक येथे सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सिंहगड कॉलेज परिसरात ५ घरांवर संरक्षक भिंत कोसळली. यात मध्य प्रदेश- छत्तीसगडमधील ६ मजूर ठार झाले. मृतांमध्ये  राधेलाल पटेल (२५), जेटूलाल पटेल (५०), ममता राधेलाल (२२), जितू चंदन रवते (२४), जेटूलाल पटेल(४५), ममता पटेल (२४) यांचा समावेश आहे. 


नाशकात पाण्याची टाकी काेसळून ४ मजुरांचा मृत्यू
नाशिक | गंगापूर राेडवरील निर्माणाधीन ‘अपना घर’ या गृहप्रकल्पातील मजुरांसाठी बांधलेली पाण्याची टाकी काेसळून बिहार व अाेडिशातील ४ मजुरांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रौनक इन्फ्राचे भाविन पटेल, श्वेता इन्फ्रास्ट्रक्चरचे सुजॉय गुप्ता, आशिषसिंग, प्रकल्प व्यवस्थापक सचिन शेवडे, अभियंता नारायण कडलग यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गुप्ता वगळता चौघांना अटक करण्यात आली.


मुख्य धावपट्टी उद्या सुरू होण्याची शक्यता
मुंबई विमानतळावर सोमवारी रात्री स्पाइसजेटचे जयपूरहून आलेले विमान घसरल्याने बंद असलेली मुख्य धावपट्टी गुरुवारी सुरू होईल.