Mumbai Rain / मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने अनेक भागांमध्ये पाणी, शाळांना सुट्या जाहीर; 7 जिल्ह्यांमध्ये अॅलर्ट

हवामान विभागाने पुणे, मुंबई, ठाणेसह 7 जिल्ह्यांमध्ये अॅलर्ट जारी केला

Sep 04,2019 02:52:47 PM IST

मुंबई - मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. यात मंगळवार आणि सलग बुधवारी सुरू असलेल्या संततधार पावसाने अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग आणि पालघर इत्यादी शहरांमध्ये ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तसेच बृहन्मुंबई महानगर पालिकेने बुधवारी सर्वच शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मुंबईतील कुर्ला परिसरात मीठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर त्या ठिकाणी एनडीआरएफचे एक पथक बचावासाठी रवाना करण्यात आले आहे.

रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीचा खोळंबा
करजत येथे मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे, ट्रेन क्रमांक 11026 पुणे-भुसावळ एक्सप्रेस पुणे दौंड मनमाड अशी धावणार आहे. तर पुणे-पनवेल पॅसेंजर क्रमांक 51318 चा मार्ग करजत पर्यंतच ठेवण्यात आला आहे. सेंट्रल रेल्वे विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, विक्रोली-कांजुरमार्ग दरम्यान मुसळधार पावसाने पाणी साचल्यामुळे सर्वच 6 लाइन बंद ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वे विभागाची टीम वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी काम करत आहेत. हार्बर लाइनवर कुर्ला आणि चुनाभट्टी दरम्यानच्या सेवा देखील थांबवण्यात आल्या आहेत. सायन आणि भांडूप स्टेशन, ठाणे आणि सीएसएमटी स्टेशन या दरम्यानच्या 4 रेल्वे लाइन तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

X