Home | Maharashtra | Mumbai | mumbra ats raid news in marathi

एटीएस’ने अटक केलेल्या संशयितांच्या घरात स्मशानशांतता, कारवाई फेक असल्याचा आरोप

मंदार जोशी, फिरोज सय्यद | Update - Mar 14, 2019, 09:15 AM IST

‘२१ जानेवारीच्या रात्री तीन वाजता घराचा दरवाजा खटखटला तेव्हा घरातले सगळे लोक झोपलेले होते. आम्ही दार उघडले.

 • mumbra ats raid news in marathi

  मुंब्रा - ‘२१ जानेवारीच्या रात्री तीन वाजता घराचा दरवाजा खटखटला तेव्हा घरातले सगळे लोक झोपलेले होते. आम्ही दार उघडले. सलमानची चौकशी करायला आलो आहोत, असे समोरच्यांनी सांगितले. साध्या वेशातील ते पोलिस असावेत. नेमके काय घडत होते हे आम्हाला कळत नव्हते. काय झाले म्हणून आम्ही त्यांना विचारत होतो. कोणीच काही माहिती दिली नाही. दीड तासाच्या चौकशीनंतर ते सलमानला घेऊन गेले. चौकशीनंतर सोडून देऊ, एवढेच ते म्हणाले होते. आज दीड महिना उलटला तरी तो घरी आलेला नाही. शालेय विद्यार्थ्यांना फुटबॉलचे प्रशिक्षण देणाऱ्या आमच्या मुलाने नेमके काय केले हे आम्हाला कोणी सांगायला तयार नाही.’


  मुंब्रा येथील खान कुटुंबीयांची ही दास्तां. या एकाच घरातील तीन सख्ख्या भावांसह जावयाला आणि एका मुलाच्या मेहुण्याला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. सिराजोद्दीन खान २५ ते ३० वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावातून मुंबईत आले. आता त्यांचे वय ६५ आहे. पत्नी फातिमा ही साठ वर्षांची आहे. ते सांगतात की, आमचे पोट हातावर आहे. पोटाला चिमटा देऊन मुलांना शिकवले. अजूनही परिस्थिती बेताची आहे. पाचही मुले हाताला मिळेल ते काम करतात. पोलिसांना संशय असलेले काम करण्यासाठी त्यांना कसा वेळ मिळेल हेच आम्हाला कळत नाही. पोटाची भूक भागवतानाच आमची दमछाक होते. गावातील लोक, नातेवाईक प्रश्नार्थक नजरेने पाहतात, त्यांना काय उत्तर द्यावे हे कळत नाही.


  नेमके काय आहे प्रकरण : मुंब्रा आणि औरंगाबाद येथून २१ जानेवारी रोजी रात्री नऊ आणि २७ जानेवारीला एक अशा दहा जणांना अटक केली. त्यांच्या घरातून अनेक रासायनिक पदार्थ जप्त केल्याचा आणि हे सर्व तरुण भारतात बंदी असलेल्या इसिस या संघटनेच्या संपर्कात असल्याचा दावा एटीएसकडून करण्यात आला आहे. या तरुणांनी ‘उम्मत ए मोहंमदिया’ हा व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार केला होता. उत्तर प्रदेशात झालेल्या कुंभमेळ्यात रासायनिक हल्ला करणे, शिवरात्रीच्या दिवशी ठाण्यातील महादेवाच्या मंदिराच्या महाप्रसादात विष कालवण्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. त्यांच्या घरातून १३ रबरी ग्लोव्हज, उंदीर मारण्याचे औषध, फिनाइल, मोबाइल, चाकू, हार्डडिस्क, लॅपटॉप, टॅब, यासह विषारी द्रव्य आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. नुमाइंदा कौन्सिल, जमेतुल उलेमा ए हिंद आदी संघटनांनी या कारवाईबाबत संशय व्यक्त केला आहे.


  अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये एक इंजिनिअर, फार्मासिस्ट, एमबीए यांच्यासोबतच फुटबॉल प्रशिक्षक आिण खेळाडूचा समावेश आहे, त्याचबरोबर औरंगाबादमध्ये अटक करण्यात आलेला तरुण डिझायनर आहे, तर एकाचा चपला विक्रीचा व्यवसाय आहे.


  दहापैकी नऊ जणांचे उत्तर प्रदेश कनेक्शन
  अटक करण्यात आलेल्या १० संशयितांपैकी मुशाहेजउल इस्लाम वगळता सर्व नऊ जणांचे उत्तर प्रदेशशी संबंध आहेत. मोहसीनचे वडील सिराजोद्दीन खान हे मूळ उत्तर प्रदेशातील आहेत. मोहंमद सर्फराज ऊर्फ अबू हमजा हा त्यांचा जावईदेखील यूपीचा आहे. मजहर अब्दुल रशीद शेख फहाद मोहंमद इस्तेयाक अन्सारी, जमान नवाब खुटेपाड, तल्हाक ऊर्फ अबू बकर हनिफ पोत्रिक, १७ वर्षांचा मुलगा या सर्वांचेे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उत्तर प्रदेशाशी संबंध आहेत. या वर्षीचा कुंभमेळा हादेखील उत्तर प्रदेशातील अलाहाबाद म्हणजे प्रयागराज येेथे होता.


  दुअा करने के अलावा कुछ भी हाथ में नहीं
  फुटबॉल प्रशिक्षक असणाऱ्या सलमानच्या क्रीडा साहित्याकडे हात दाखवत त्याचे वडील सांगू लागतात, घरातील पाचपैकी ितघांना अटक झाली, जावई-एका मुलाचा मेहुणा यांनाही अटक करण्यात आली आहे. सिराजोद्दीन यांच्या म्हणण्यानुसार, ते ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात त्याच्या मेंटेनन्सचे काम करतात. त्यामुळे पाण्यात टाकायचे औषध, इमारतीच्या आजूबाजूला आणि घरात असणाऱ्या रोपट्यांसाठी आणलेली कीटकनाशके घरात असतात. तीच पोलिस सोबत घेऊन गेले. लॅपटॉप, मोबाइल हे सगळंच घेऊन गेले. रोपट्यांसाठीची कीटकनाशके घातपात करण्यासाठी कशी वापरता येतील? ही औषधे तर प्रत्येकाच्या घरी असतात, असेही त्यांचे म्हणणे आहे. ‘आता फक्त पाच वेळा नमाज पढणे आणि दुअा करणे हेच आमच्या हातात आहे’, असे म्हणत खान दांपत्य रडायला लागले.


  कारवाईच नाही, तर समुपदेशनही : एटीएस
  एटीएसकडून केवळ कारवाईच केली जाते असे नाही, तर त्यांचे समुपदेशनाचे कामही हे पथक करते, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. दोन वर्षांत राज्यात ११४ जणांना देशविघातक कार्यापासून रोखण्यात आले असून त्यात १४ तरुणींचाही समावेश आहे. तर या वाटेवर जाणाऱ्या तब्बल ४०० हून अधिक जणांचे समुपदेशन करून राेजगारासाठी प्रशिक्षण दिले. या प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप, दबाव असल्याचे म्हणणेही कुलकर्णी यांनी फेटाळून लावले आहे. मुंब्य्रातील तरुण मात्र खूप पुढे गेले हाेते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी लागली.

Trending