Home | Maharashtra | Mumbai | mungantivar resigns demanded by Mungantiwari, further reason for malnutrition

मुनगंटीवारांनी मागितला मनेकांचा राजीनामा, कुपोषणाचे कारण पुढे

प्रतिनिधी | Update - Nov 07, 2018, 08:51 AM IST

मनेका गांधी यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकेची झाेड उठवत, त्यांच्या हकालपट्टीची अप्रत्यक्ष मागणी

 • mungantivar resigns demanded by Mungantiwari, further reason for malnutrition

  मुंबई - कथित नरभक्षक टी-१ (अवनी) वाघिणीला यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा विभागात सरकारच्या अादेशाने व्यावसायिक शिकाऱ्याने ठार केले, त्यानंतर मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापले अाहे. भाजपच्या प्राणीप्रेमी नेत्या तथा केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकेची झाेड उठवत, त्यांच्या हकालपट्टीची अप्रत्यक्ष मागणी केली हाेती. त्यावर मुनगंटीवार यांनी मंगळवारी प्रतिहल्ला चढवत देशातील कुपोषित बालकांच्या मृत्यूप्रकरणी मनेका गांधी यांनी प्रथम राजीनामा द्यावा मग, माझ्या राजीनाम्याची मागणी करावी, असे आव्हान एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले.


  मनेका गांधी या केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री आहेत. देशात कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याची जबाबदारी स्वीकारुन प्रथम त्यांनी राजीनामा द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्याप्रमाणे मनेका यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतील त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतील, असा टाेला मुनगंटीवार यांनी लगावला.
  मनेका गांधी यांची भूमिका शेतकरी व आदिवासी विरोधी असल्याचे यवतमाळ जिल्ह्यात वन्यजीव रक्षक चळवळ चालविणारे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. दाेन महिन्यापूर्वी मनेका यवतमाळ जिल्ह्यात आल्या होत्या. तेव्हा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या महिलांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेण्याचे सौजन्य दाखवले नसल्याचे तिवारी यांनी सांगितले.

  कंपन्यांसाठी वाघिणीची हत्या : पाटील

  रिलायन्स आणि बिर्ला या कंपन्यांना मदत करण्यासाठी अवनी (टी १) वाघिणीला ठार करण्यासाठी वनविभागाने झोकून काम केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. तर शिवसेनेने मुखपत्रातून राज्य सरकार व मुनंगटीवार यांच्यावर टीकेची झाेड उठवणे सुरू केले अाहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत व युवा सेनेचे प्रमुख अादित्य ठाकरेही मुनगंटीवार यांना लक्ष्य करत अाहेत. या पार्श्वभूमीवर १९ नोव्हेंबर पासून मुंबईत सुरु होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘अवनी’ प्रकरण चांगलेच गाजणार असल्याची चिन्हे अाहेत.

  राजीनाम्याची गरज नाही : मुख्यमंत्री

  केंद्रीय मंत्री तथा भाजपच्या नेत्या मनेका गांधींनी सुधीर मुनंगटीवार यांच्यावर टीकेची झाेड उठवली असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र मुनगंटीवार यांंची पाठराखण करत अाहेत. ‘अवनी वाघिणीला नेमक्या काेणत्या परिस्थितीत मारावे लागले हे पाहावे लागेल,’ असे सांगत त्यांनी त्यांना अभय देण्याचे संकेत दिलेच हाेते. त्यापाठाेपाठ मंगळवारी उस्मानाबादेत पत्रकारांशी बाेलताना मुख्यमंत्र्यांनी ‘मुनगंटीवार कुणाला बंदूक घेऊन मारायला गेलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांचा राजीनामा मागणे योग्य होणार नाही’ असे स्पष्टपणे सांगून टाकले. अवनीच्या हत्येच्या प्रक्रियेत काही चुक झाली असेल तर चाैकशी करून कारवाई केली जाईल, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

Trending