आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नगण्य करवसुलीमुळे मनपाचे सहा करवसुली लिपिक निलंबित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- कोट्यवधी रुपयाच्या मालमत्ता कर वसुलीकडे दुर्लक्ष केल्याचा फटका मालमत्ता कर विभागातील ६ कर वसुली लिपिकांना बसला. या कर वसुली लिपिकांना ६ सप्टेंबर रोजी आयुक्त जितेंद्र वाघ यांनी निलंबित केले. दरम्यान सहा कर्मचाऱ्यांचे एकाच दिवशी निलंबन झाल्याने आता कर वसुली कर्मचाऱ्यांची संख्या केवळ २९ राहिली आहे. 


महापालिकेचे क्षेत्रफळ वाढून १२५ चौरस किलोमीटर झाले आहे. मालमत्तांची संख्याही १ लाख ५० हजाराच्या वर गेली आहे. मालमत्तांची संख्या वाढल्याने तसेच रिअसेसमेन्ट आणि करवाढ केल्याने महापालिकेला कोट्यवधी रुपयाचा कर वसूल करावा लागणार आहे. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तसेच इतर देणी देण्या करीता मालमत्ता कराची अधिक वसुली आवश्यक आहे. तूर्तास महापालिकेला ४० कोटी थकीत तर ४८ कोटी चालू आर्थिक वर्षातील कर वसूल करावा लागणार आहे. याबाबत कर वसुली लिपिकांना वारंवार सूचनाही प्रशासनाने दिल्या. मात्र या सूचनांकडे कर वसुली लिपिकांनी दुर्लक्ष केले. आयुक्तांनी नुकत्याच घेतलेल्या कर विभागाच्या आढावा बैठकीत काही कर वसुली लिपिकांनी कर वसुलीकडे अत्यंत दुर्लक्ष केल्याची बाब लक्षात आली. त्याच प्रमाणे रजा घेताना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेतल्याची बाबही निदर्शनास आली. नगण्य कर वसुली म्हणजे कर्तव्यात कसूर असल्याने प्रशासनाने या सहा कर वसुली लिपिकांना निलंबित केले आहे. यात राजेंद्र गाडगे, संतोष साबळे, राहुल देशमुख, शंकर शिरसाट, ज्ञानेश्वर देशमुख, ईश्वर नरडे या सहा कर वसुली लिपिकांचा समावेश आहे. 


निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागी नियुक्ती नाही 
प्रशासनाने नगण्य कर वसुलीचा ठपका ठेवून ६ कर वसुली लिपिकांना निलंबित केले आहे. त्यामुळे आता ३५ पैकी २९ कर वसुली लिपिक कार्यरत आहे. यापुढे सुरु होणारी थकीत कर वसुली मोहिम लक्षात घेता, निलंबित केलेल्या सहा कर्मचाऱ्यांच्या जागी दुसऱ्या सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाने असे न केल्याने याचा परिणाम वसुलीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


महिना भरात केवळ तीन ते चार मालमत्तांची वसुली 
आयुक्त जितेंद्र वाघ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत काही कर वसुली लिपिकांनी महिना भरात केवळ तीन ते चार मालमत्ता धारकांकडून कर वसुली केल्याची बाब निदर्शनास आली. दिवसाकाठी एक मालमत्ताची वसुली किमान अपेक्षित असते.यावरून काही कर्मचारी कामच करीत नाहीत, ही बाब स्पष्ट होते. 

0