आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत बांधकामापोटी ५० हजारांची लाच घेताना मनपाचे अभंग अटकेत!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अनधिकृत बांधकामाचे जप्त केलेले साहित्य जप्त परत देण्यासाठी आणि बांधकाम पुन्हा सुरू करण्यासाठी मागितलेल्या ७५ हजार रुपयांपैकी ५० हजारांची लाच कंत्राटी दुय्यम आवेक्षक सचिन श्रीरंग दुबे (३२) याच्यामार्फत स्वीकारताना महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख छबूलाल म्हातारजी अभंग (५५) यांना दुबेसह अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबी) महापालिकेतच सापळा रचून दुपारी सव्वातीन वाजता ही कारवाई केली. 


तक्रारदाराच्या मुलीने बीड बायपासच्या शहानगरमध्ये प्लॉट विकत घेऊन घर बांधण्यास सुरुवात केली होती. परंतु त्यांनी मनपाकडून बांधकाम परवानगी घेतली नव्हती. हा प्रकार दुबे याला कळला होता. त्याने तो अभंग यांना सांगितला. सात दिवसांपूर्वी अभंग यांनी पथकासह जाऊन शहानगर येथे सुरू असलेल्या बांधकामाचे साहित्य जप्त करत तक्रारदाराच्या मुलीला नोटीस देऊन बांधकाम बंद करण्यास सांगितले. त्यानंतर मुलीने वडिलांसह अतिक्रमण विभागात साहित्य परत मिळावे यासाठी चकरा मारण्यास सुरुवात केली. परंतु दुबे व अभंग यांनी साफ नकार दिला. 


गुरुवारी मुलीचे वडील पुन्हा विभागात गेले. तेव्हा दुबे याने त्यांना अभंग साहेबांना ७५ हजार रुपये द्यावे लागतील, सर्व साहित्य परत देतो व बांधकामही सुरू करता येईल, असे सांगितले. त्यानंतर लगेच तक्रारदाराची अभंग यांच्याशी भेट करवून दिली. अभंग यांनीही ७५ हजार रुपये लागतील, असे सांगितले. तक्रारदाराने शुक्रवारी सकाळी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर दुपारी सव्वातीन वाजता सापळा रचून मनपा कार्यालयातून दुबेला तर अभंग यांना घरातून अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक शंकर जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, नितीन देशमुख, पोलिस नाईक विजय बाम्हंदे, रवींद्र देशमुख, गोपाल बरंडवाल, दिगंबर पाठक, संदीप चिंचोले यांनी कारवाई पार पाडली. रात्री सिटी चौक पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 


मनपाने कंत्राटी पद्धतीने महाराणा सिक्युरिटी संस्थेकडून कर्मचारी घेतले आहेत. त्यात दुबेही कंत्राटी होते. त्यांना इमारत निरीक्षक म्हणून ठेवले होते. मनपाचे इमारत निरीक्षक गवळी यांचे ते जावई आहेत. दुबे हे अभंग यांचे हस्तक असल्याचे सूत्रांनी सांगितले. 


मोठ्या भानगडी समोर येण्याची शक्यता
सातारा-देवळाईसह शहरात अन्य ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्याची सर्व माहिती अतिक्रमण विभागप्रमुख म्हणून अभंग आणि त्या त्या प्रभागातील इमारत निरीक्षकांना आहे. त्याची सविस्तर चौकशी या निमित्ताने होणे आवश्यक असून यातून अनेक प्रकरणे समाेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


पोलिसांचा गैरवापर...

अतिक्रमण हटाव विभागाला २० पोलिस अधिकारी व कर्मचारी दिले आहेत. मनपाचे चतुर अधिकारी व कर्मचारी पोलिसांना वाहनात बसवून अनधिकृत बांधकामाच्या अगदी जवळ नेतात. सोबत जेसीबी व इतर यंत्रणा असतेच. सायंकाळी संबंधिताला बोलावून हा प्रश्न अधिकारी एका टेबलवर बसून सोडवत. कारवाईचे नाट्य करून त्यानी तक्रारदांनाही लुबाडल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत ओहत. 


गाजलेली लाच प्रकरणे...

तत्कालीन मुख्य लेखाधिकारी स्व. महेंद्र खैरनार, कनिष्ठ अभियंता बी.के.गायकवाड, आर.पी. वाघमारे, लिपिक श्रीकांत, सहायक आयुक्त प्रियंका केसरकर यांच्या शिपायाने लाच घेतली होती. मात्र, केसरकर यांचा त्याच्याशी संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. अलीकडेच उपायुक्त अय्युब खान, लिपिक लाहोटी यांच्यावरही तसाच आरोप आहे. 


बांधकाम दिसले की आधी इशारा, मग सेटलमेंट 
शहरात अनधिकृत बांधकामांची संख्या ५ हजारांहून अधिक आहे. शहराच्या चारही बाजूंनी झपाट्याने बांधकामे सुरू आहेत. जिथे नवीन बांधकाम दिसले तेथे अतिक्रमण हटाव पथकाचे अधिकारी, कर्मचारी पोहोचतात. अनधिकृत बांधकाम दोन दिवसांत पाडू, अशी धमकीच देण्यात येते. नंतर त्याला 'न्याय' देण्याचे काम या विभागातील अधिकारी व कर्मचारी अत्यंत खुबीने करतात. शहरात अनधिकृत बांधकामे, प्लॉटिंग, नाले गायब करणे, डीपी रोडवर प्लॉटिंग, मुख्य रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने अतिक्रमणे होत असतानाही महापालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग कुठेच कारवाई करताना दिसून येत नाही. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे ठरावीक उत्तरे असतात. 

 

दुबे, अभंगमुळे सातारा-देवळाईत सुरू होती ८० अनधिकृत बांधकामे 
सातारा-देवळाई वॉर्डात दुबे इमारत निरीक्षक म्हणून काम करत होते. अभंगचे हस्तक असल्याने या दोन्ही वॉर्डात यांच्याच आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. ज्यांनी चिरीमिरी देण्यास विरोध केला, त्यांच्यावर दुसऱ्याच दिवशी साहित्य जप्तीची कारवाई होत होती. नंतर पुन्हा जाऊन प्रकरण सेटल करून साहित्य परत देण्यात येत होते. दोन्ही वॉर्डांत गेल्या तीन वर्षांपासून केवळ १८ अधिकृत बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. उर्वरित बांधकामे ही अभंग यांच्या आशीर्वादाने सुरू होती. सध्या या भागात १३२ पेक्षा जास्त घरांची आणि मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. याची सर्व माहिती असतानाही अभंग यांच्याकडून येथे कारवाई करण्याऐवजी केवळ सेटलमेंट करून अशा बांधकामांना अभय देण्यात येत होते. दोन महिन्यापूर्वी दिल्ली गेट येथे अतिक्रमण काढत असताना एकाने अभंग यांच्यावर आरोप करून ज्यांनी पैसे दिले त्यांना अभय दिले. माझेच अतिक्रमण काढत आहे. मीही पैसे देण्यास तयार असल्याचे म्हटले होते. यावर अभंग यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र कारवाईच्या तीन दिवसांनंतर पुन्हा सर्व फर्निचरचे अतिक्रमण जैसे थे झाल्याचे दिसून आले. 


असे अडकले अभंग, दुबे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात 
१ तक्रारदाराने गुरुवारी अभंग व दुबे दोघांची भेट घेतल्यावर त्यांनी प्रत्यक्ष मागणी केल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता पथकाने तक्रारदारासोबत एक पंच व रेकॉर्डर देऊन तक्रारीची पडताळणी करण्यासाठी पाठवले. 
२ तक्रारदार, पंच अतिक्रमण विभागात अभंग यांच्या दालनात गेले. तेथे दुबेही उपस्थित होता. तक्रारदाराने ७५ हजार रुपये जमत नसून रक्कम कमी करण्याची विनंती केली. काही मिनिटे नकार कळवत अखेर अभंग यांनी ५० हजार द्यावेच लागतील, असे सांगितले. 
३ रक्कम आजच देतो, कुठे आणि कोणाकडे देऊ, असे तक्रारदाराने विचारल्यावर अभंग यांनी दुबेकडेच पैसे देऊन टाक, असे सांगितले व निघून गेले. दुपारी अभंग घरी गेलेले होते. दुबे कार्यालयात बसलेला होता. रचलेल्या सापळ्यानुसार तक्रारदार ५०००० रुपये घेऊन दालनात गेला व दुबेला पैसे दिले. 
४ त्याने हा प्रकार अभंग यांना कॉल करून सांगितला. पैसे घेताच बाहेर उभे असलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. दुसरीकडे अभंग यांनी लाच मागितल्याची पडताळणी सकाळीच झालेली होती. त्यामुळे दुसऱ्या पथकाने घरी जेवण्यासाठी गेलेल्या अभंग यांना घरातून अटक केली. 

बातम्या आणखी आहेत...