आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दृश्यम\'सारखा बनाव, पण चिठ्ठीत होते असे काही की, सर्व काही झाले उघड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रागाच्या भरातील बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर चार आरोपी एकत्र बसले. चोरट्यांच्या मारहाणीत हा प्रकार झाला, असे भासवण्यासाठी त्यांनी बनाव रचला. पोलिसांच्या चौकशीत प्रत्येकाने कोणते एकच वाक्य सांगायचे हे दृश्यम चित्रपटाप्रमाणे कागदावर लिहून त्याचे पाठांतर करवून घेतले. पण चित्रपटात घडते तसे खऱ्या पोलिस तपासात घडण्याची शक्यता कमीच असते. झालेही तसेच. पोलिस झाडाझडती घेत एका आरोपीच्या फ्लॅटवर पोहोचले. तेथे पाठांतरासाठी लिहिलेली चिठ्ठी सापडली आणि २४ तासांत खुनाचा उलगडा झाला. कचरा वाहतुकीच्या हायवावर चालक म्हणून काम करणाऱ्या नितीन ऊर्फ बाळू भीमराव घुगे (२४, रा. देवपूर, ता. कन्नड, ह. मु. जाधववाडी) याचा खून करणारा मनपाचा कचरा उचलणारा ठेकेदार मनोज बद्रीनाथ डव्हारे (२४, रा. कैलासनगर) याला पोलिसांनी अटक केली. त्याचा मावसभाऊ व ठेकेदार नील काकासाहेब काकडे पाटील (रा. संजयनगर), शुभम साळुंके (२२, रा. संजयनगर) व नीलचा चालक दत्ता भांगे हे तिघे फरार झाले आहेत. 


नितीनचा गुरुवारी (२० सप्टेंबर) सेंट्रल नाका येथे मृतदेह आढळला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो नीलच्या काल्डा कॉर्नर येथील अर्चना अपार्टमेंटमधील पाच खोल्यांच्या फ्लॅटवर राहत होता. अचानक तो त्याचा भाऊ सचिनच्या जाधववाडी येथील घरी राहण्यासाठी गेला. यादरम्यान त्याने तुमच्या फ्लॅटवरचे फॅन व इतर साहित्य चोरून नेल्याचे पाटील यांना त्यांचा कर्मचारी शुभम साळुंकेने सांगितले. तेव्हा मनोजने नितीनला साहित्य परत देण्यास सांगितले. तेव्हा गावाहून आलो की परत करतो असे तो म्हणाला. त्यानंतर २० सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजता डव्हारेने नितीनला जाधववाडी शरद टी पॉइंट येथे बोलावले. त्याने मित्र मयूर वैष्णवची कार (एमएच २० डीजे ६२३४) मागवली. त्यांनी रवी नावाच्या मित्राला सोबत घेतले. शरद टी पॉइंट जवळ जाऊन त्यांनी नितीनला त्याची दुचाकी घेऊन येण्यास सांगितले. 
तो बेशुद्ध पडला : नितीन दुचाकीवर आल्यानंतर डव्हारेने मयूर व रवीकडे दुचाकी सोपवत आपल्या घराजवळ उभी करा, असे सांगितले. त्यामुळे रवी व मयूर दुचाकी घेऊन निघून गेले. त्यानंतर डव्हारे व नितीन कारने नील पाटीलच्या संजयनगर येथील घरी गेले. तेथून फ्लॅटमध्ये जाताच नीलने लाकडी फळीने नितीनला मारहाण सुरू केली. तोपर्यंत दत्ता भांगे व शुभम साळुंके फ्लॅटवर पोहोचले. नितीन रडत त्याची माफी मागत होता, परंतु नीलने त्याला बेदम मारहाण केली. यात तो बेशुद्ध पडला. शुभम, डव्हारे व दत्ताच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी नीलला बाजूला केले. मग नितीनला घाटीत घेऊन जा, असे नीलने डव्हारे, शुभम, दत्ताला सांगितले. तत्पूर्वी बनाव रचला. ठरल्यानुसार तिघांनी होंडा सियाज कारमध्ये टाकून नितीनला घाटीत नेले. तेथे तो काहीतरी बोलत होता. पण त्याचे गांभीर्य डॉक्टर किंवा इतरांना लक्षात आले नाही. पाचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच डव्हारे फ्लॅटवर गेला. शुभम, दत्ता आधीच निघून गेले होते. डव्हारेने नितीनच्या भावाचा मोबाइल क्रमांक मिळवून त्याला हा प्रकार सांगितला. सचिन घाटीत पोहोचला. त्यानंतर डव्हारेने मयूर व अविनाशला क्रांती चौकात बोलावून घेतले. 


घाटी रुग्णालयात उभा राहिला : मयूरला कार सुपूर्द करून तो अविनाशच्या दुचाकीवर घाटी रुग्णालयात जाऊन उभा राहिला. तीन-चार वेळेस सिडको पोलिस, गुन्हे शाखेने त्याची चौकशी केली. यादरम्यानच पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व रात्री उशिरा प्रकरणाचा उलगडा झाला. सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मधुकर सावंत, निर्मला परदेशी, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, राहुल सूर्यतळ, उपनिरीक्षक विजय पवार, अनिल वाघ, कर्मचारी मच्छिंद्र ससाणे, गोविंद पचरंडे, किरण गावंडे, विजय पिंपळे, रवींद्र दाभाडे, दत्ता ढंगारे, नवाब शेख, वीरेश बने, दत्तात्रय गढेकर, शिवाजी बोर्डे, हिरासिंग राजपूत यांनी कारवाई पार पाडली. 


'दृश्यम'स्टाइल बनाव रचला, पण ... : चौकशीत नीलचा फ्लॅट असल्याचे समोर येताच गुन्हे शाखेचे निरीक्षक सावंत यांनी फ्लॅटची झाडाझडती घेतली. तेथे दोन ठिकाणी रक्त व सर्वात महत्त्वाचे म्हणजे बनावाची मांडणी करणारी कच्ची चिठ्ठी सापडली.  


जसे ठरले, तसेच सांगितले 
नितीनला सेंट्रल नाका परिसरात चोरांनी अडवून चोरीसाठी मारहाण केली. त्याने कॉल केल्यावर डव्हारे व इतरांनी त्याला धीर दिला. पेनकिलर गोळीही दिली. नंतर घाटीत दाखल केले, असे सांगण्याचे आरोपींनी पाठांतर केले आणि पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलेही तसेच. 


नील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा 
नील व डव्हारे मावस भाऊ असून नीलचा वाळू विक्रीचा व्यवसाय आहे. नील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने डव्हारेला हायवा खरेदी करण्यास मदत करून तीन हायवा कचरा वाहून नेण्यासाठी लावल्या होत्या. 

 

 

बातम्या आणखी आहेत...