पेट्रोल उशिरा अाणल्याच्या / पेट्रोल उशिरा अाणल्याच्या वादातून चाकूने भोसकून सातपूरला युवकाची हत्या

Dec 18,2018 10:30:00 AM IST

सातपूर - सातपूर औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनीसमोर एका युवकाची पाेटात चाकू भाेसकून त्याच्याच तीन मित्रांनी हत्या केल्याची घटना सोमवारी (दि. १७) सकाळी उघडकीस आली. खुनाची ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. यातील मृताचे नाव अमोल बागले असे असून याप्रकरणी पाेलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. किरकोळ कारणातून हा खून झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि सचिन बागले याने दिलेल्या तक्रारीनुसार, अमोल अशोक बागले (२५, रा. साईबाबा गार्डन, शिवाजीनगर) याच्यासाेबत औद्योगिक वसाहतीतून जात असताना रात्री नऊच्या सुमारास त्याच्या गाडीतील पेट्राेल संपले. अमोलने त्याचा मित्र संशयित लोकेश अशोक थोरात (रा. शिवाजीनगर) यास फोन करून पेट्रोल आणण्यास सांगितले. तो आपल्या अन्य दोन मित्रांसोबत रात्री साडेदहाच्या सुमारास पेट्रोल घेऊन आला. अमोलने पेट्रोल आणण्यास उशीर केल्याने त्याचा लोकेश थोरात याच्याबराेबर वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयिताने अमोलच्या पोटात चाकू खुपसला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले. सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सातपूर पोलिस ठाण्यात अमोलचा चुलतभाऊ सचिन भाईदास बागले यांच्या फिर्यादीवरून लोकेश थोरात व त्याच्या दोन मित्रांविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित लोकेश थोरात व त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले अाहे. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुटे, सहायक उपनिरीक्षक शांतिलाल चव्हाण तपास करीत आहे.
जिल्हा रुग्णालयात तणाव : उपचार सुरू असताना अमोलचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी गर्दी केली. रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाइकांसह मित्रमंडळीने घेतला. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुटे, अशोक भगत यांनी नातेवाइकांची समजूत काढली. संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगितल्यानंतर तणाव निवळला.


आठवड्यात खुनाची दुसरी घटना : सातपूर परिसरात आठ दिवसांपूर्वी बेलगाव ढगा परिसरात डोंगराच्या पायथ्याशी एका तरुणाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला होता. या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्यात यश आले असताना खुनाची दुसरी घटना घडल्याने सातपूर परिसरात खळबळ उडाली आहे.

X