आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजीबाजारात गाडी लावण्याच्या वादातून उसळविक्रेत्याची हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - नााशिक-पुणे महामार्गावरील आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यासमोरील वीर सावरकर उड्डाणपुलाखालील भाजीबाजारात वाहन लावण्यावरून वाद झाला. यानंतर रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास या वादातून अरिंगळे मळ्यात (एकलहरा) तीक्ष्ण हत्यार पाेटात खुपसून उसळविक्रेत्याचा खून करण्यात आला. या हाणामारीत एकजण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून उर्वरित संशियतांचा शोध सुरू आहे. 


नाशिकरोड येथील बिटकाे चाैकात वीर सावरकर उड्डाणपुलाखाली भाजीपाला मार्केट तयार झाले आहे. येथे भाजीबाजारास पालिकेने विरोध केला असून येथील भाजीविक्रेत्यांना सिन्नर फाटा वा जेलरोड येथे जागा देण्यास पालिकेने दिलेली हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र, या पुलाखाली अनेकांनी स्वत: दुकान थाटले असून पालिकेच्या जागेवर पोटभाडेकरू ठेवत त्यांच्याकडून भाडे आकारले जात आहे याबाबत नाशिकरोड पोलिसांनी दिलेली माहिती आणि मारुती नरसिंग शिंदे (रा. अरिंगळे मळा, एकलहरे रस्ता) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना चारचाकी वाहन (एम.एच. १५ एफएफ ६९७२) उड्डाणपुलाखालील त्यांच्या उसळ विक्रीच्या दुकानासमोर लावायचे हाेते. मात्र, त्यांच्या दुकानासमोरील जागेत दीपक शंकर पाडळे याची दुचाकी उभी होती. ती बाजूला करण्यासाठी मारुतीने हात लावला असता दीपकने त्यास नकार देत अश्लील भाषेत बोलून मारहाण सुरू केली. 


त्यावेळी मारुतीचे वडील नरसिंग शिंदे यांनी दीपकला समजावून सांगितले. यावेळी दीपकची अाजी मीराबाईनेही शिंदे यांना शिवीगाळ केली. त्यामुळे नरसिंग शिंदे आणि दीपक यांच्यात झटापट झाली. यावेळी नागरिकांनी हे प्रकरण मिटवले. मात्र, रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास एकलहरे रस्त्यावरील अरिंगळे मळ्यातील अापल्या घराबाहेर नरसिंग शिंदे हे अापला मुलगा संदीप यास पाहण्यासाठी अाले असता बाहेर दबा धरून बसलेले दीपक शंकर पाडळे, सुरेश पांडुरंग सोनवणे, आकाश शंकर पाडळे, अमोल शंकर पाडळे आणि स्वप्नील सोनवणे या सर्वांनी नरसिंग शिंदे आणि दीपक शिंदे यांना मारहाण सुरू केली. यावेळी सुरेश सोनवणे याने हातातील धारदार तीक्ष्ण हत्याराने नरसिंगवर वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. हाणामारीत दीपक शिंदेही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकरोड पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून पाडळे यांनीही शिंदेंविरोधात तक्रार नोंदविली आहे. 


धार्मिक सणांसाठी पोलिसांची परवानगी, मग भाजीविक्रेत्यांना का नको; नागरिकांचा सवाल 
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळांना हे सण साजरे करण्यासाठी पोलिसांची आणि पालिकेची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी दोघांकडून अडवणूक केली जाते. मात्र, नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको चौकात भाजीबाजार, शिवाजी महाराज पुतळा परिसरात विक्रेते थेट रस्त्यावर भाजीपाला विक्री करतात. त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष हाेत अाहे. तर वाहतुकीला अडथळा ठरत असूनही वाहतूक पाेलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष हाेत अाहे.भाजीविक्रेत्यांना सार्वजनिक जागेवर व्यवसाय करण्यासाठी पालिका व पोलिसांची परवानगी बंधनकारक करावी, अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...