आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाने दोन मुलांच्या मदतीने केला सख्ख्या भावाचा खून, आई व मुलीला केले जखमी, दोघे अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - जावयाला घरगुती कार्यक्रमास का बोलावले या कारणावरून भावाने आपल्या दोन मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. यात भांडणे सोडवण्यास आलेल्या भावाच्या पत्नी व मुलीसही जबर मारहाण करीत गंभीर जखमी केले.सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथील डोंबाडी तांडा वसाहतीवर सोमवारी(दि.२२) रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

 

डोबाडीतांडा वसाहतीत नागनाथ सखाराम भोसले यांनी सोमवारी सायंकाळी त्यांचा जावई धीरज पवार यास घरगुती कार्यक्रमानिमित्त बोलावले होते. नागनाथचा भाऊ नायल सखाराम भोसले, त्यांचा मुलगा कन्हैया नायल भोसले व प्रकाश नायल भोसले यांचा जावई धीरज पवारशी पूर्वीचा वाद होता. याच वादातून या तिघांनी नागनाथ भोसले यास जावयाला कार्यक्रमास का बोलावले, अशी विचारणा करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी नागनाथची पत्नी छाया व मुलगी भांडण सोडवण्यास गेली असता त्यांनाही या तिघांनी जबर मारहाण केली. नागनाथ यांच्यावर कुऱ्हाडीने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी छाया व मुलगी या दोघीही या मारहाणीत गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने ग्रामस्थांनी रुग्णालयात हलवले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

 

मारहाणीनंतर बापलेक घटनास्थळावरून पळाले 
या बापलेकांनी धमक्या देत घटनास्थळावरून पळ काढला. जखमी झालेल्या छाया व त्यांच्या मुलीस तातडीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, नागनाथची पत्नी छाया भोसले(वय ४८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलिस ठाण्यात मंगळवारी(दि.२३) नायल भोसले सह त्याचे मुले कन्हैया व प्रकाश या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. अधिक तपास सोनपेठचे पोलिस निरीक्षक सोपान सिरसाठ हे करीत आहेत. 


अवघ्या काही तासांतच दोघे जेरबंद 
कौटुंबिक वादातील खुनाच्या या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दोन पथके तयार केली. या पथकांनी सिरोला गावाजवळ नायल भोसले व कन्हैया भोसले या दोघांना अवघ्या काही तासातच ताब्यात घेतले. त्यांना सोनपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दोघांना सोनपेठ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता २६ तारखेपर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकाश भोसले हा फरार आहे. 

बातम्या आणखी आहेत...