crime / काकाच्या कुटुंबाकडून पुतण्याचा खून; मृतदेह दाेन ठिकाणी पुरला; खबऱ्यामुळे 'उलगडा' 

बदनापूर तालुक्यातील घटना दररोज दारू पिऊन शेतीच्या वाटणीसाठी करायचा चुलत्यासोबत भांडण 

Sep 04,2019 08:17:00 AM IST

जालना/चंदनझिरा : शेती वाटून द्या, दारू पिऊन दररोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून चुलत्याने नातेवाइकांच्या मदतीने पुतण्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. यानंतर सकाळी ११ च्या वेळी तो मृतदेह शेतात पुरला. परंतु, ग्रामस्थांना माहिती होईल म्हणून रात्रीच्या वेळी पुरलेला मृतदेह उकरून काढून ताे गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील नदीला मिळणाऱ्या नाल्याजवळ पुरल्याची घटना बदनापूर तालुक्यातील गवळीवाडी (मांडवा) येथे २७ ऑगस्ट रोजी घडली. गणेश कोंडूअप्पा अलंकार (३०) असे मृताचे नाव आहे.


दरम्यान, गावात पोलिस खबऱ्या असलेल्या एका व्यक्तीला या घटनेची कुण-कुण लागल्याने त्याने एडीएसचे पीआय यशवंत जाधव यांना अाेझरती माहिती दिली. या माहितीच्या आधाराने जाधव यांनी तात्काळ दोन पथके पाठवून दोन जणांना उचलले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली. भागनअाप्पा सटवाआप्पा अलंकार (४५), भट्टू धोंडू झिपरे, बाळू तुकाअप्पा अलंकार, सचिन सदाशिवअाप्पा अलंकार (१९) यांच्यासह एक महिला अशा पाच आारोपींना अटक करण्यात अाली आहे. मयत व्यक्ती व आरोपी हे नातेवाइक आहेत. गणेश अलंकार हा नेहमीच दारू पिऊन त्रास देत होता. ताे सतत शेती वाटून देण्यासाठी चुलत्याकडे तगादा लावत हाेता. शेती वाटण्याच्या कारणामुळे सहा आरोपींनी त्याला मारण्याचा कट रचला होता. दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ८ च्या सुमारास गणेशला त्याच्या राहत्या घरी आईसमोर लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. यानंतर भट्टू धोंडू झिपरे याने डोक्यात दगड घातल्याने तो अजूनच गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याला त्याच घरात ठेवले. परंतु, सकाळी तो मरण पावला असल्याचे लक्षात येताच दुपारच्या वेळी गावाजवळील रामभाऊ अंभोरे यांच्या शेताजवळ दुपारी पुरले. परंतु ग्रामस्थांना याची माहिती होईल म्हणून पुन्हा रात्री तो मृतदेह बाहेर काढून सिंधी पिंपळगाव शिवारातील चित्तोडा नदीच्या पश्चिमेस असलेल्या नाल्याच्या कोपऱ्यातील खड्ड्यात पुरुन टाकला.

गावात बोभाटा होण्याच्या भीतीने मृतदेह उकरून दुसरीकडे नेऊन पुरला...
२७ ऑगस्ट रोजी मारहाण झाल्याने दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास गाव परिसरातच मृतदेह पुरला. परंतु, या प्रकरणाचा काही अंशी गावात बोभाटा झाला होता. पोलिस आले तर त्या ठिकाणी मृतदेह उकरतील. गावकऱ्यांना माहिती होणार नाही म्हणून आरोपींनी त्याच रात्री ८ वाजेच्या सुमारास गावालगत पुरलेला मृतदेह उकरून तो पोत्यात टाकला. मृतदेह एकाने खांद्यावर घेऊन गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीच्या नाल्यात खड्डा खोदून पुरला. असा आठ तासांत दोन ठिकाणी हा मृतदेह पुरण्यात आला होता.


दोन तासांतच कबुली
गोपनीय खबऱ्याकडून आलेल्या माहितीनुसार वरिष्ठांना माहिती देऊन तात्काळ दोन पथके स्थापन करून दोन जणांना ताब्यात घेत विचारपूस केली असता दोन तासांत आरोपींनी कबुली दिली. यानंतर घटनास्थळी जाऊन रात्री उशिरापर्यंत कारवाई केली. - यशवंत जाधव, पोलिस निरीक्षक, एडीएस, जालना.

X