आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिंतुरात भरदिवसा एकाचा शस्त्राचे वार करून खून; फोन करून बोलावून घेत केला हल्ला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी : जिंतूर शहरातील एका दुकानावर काम करणाऱ्या युवकास मोबाइलवरून फोन करीत बोलावून घेवून त्याचा धारदार शस्त्राने खून करण्याचा प्रकार मंगळवारी(दि.तीन) दुपारी एकच्या सुमारास घडला.  या खुनामागील कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी खुनातील चाकू जप्त केला आहे. 


शहरातील संभाजीनगर भागात वास्तव्यास असलेला योगेश मल्हारी राऊत (वय २१) हा एका दुकानावर नोकर म्हणून कामास होता. त्याला आई, भाऊ व बहीण असा परिवार आहे. मंगळवारी दुपारी तो दुकानात काम करीत असताना अज्ञात व्यक्तीने त्याला फोन करून गुरुकुलच्या समोर येण्यास सांगितले. त्याप्रमाणे योगेश हा आपल्या मोटारसायकलवरून(एम.एच.-२२-एटी-४७२२) गुरुकुलकडे जाण्यास निघाला. जिंतूर ते वरूड रस्त्यावर असलेल्या गुरूकुलसमोर राज्य वखार महामंडळाच्या समोर योगेश असताना अज्ञात व्यक्तीने त्याची गाडी अडवून मारहाण केली. त्याच्यावर धारधार चाकूने पोटात वार केले. त्यात तो गंभीर जखमी होऊन वेअर हाऊसच्या बाजूला कोसळला. त्याची मोटारसायकलही एका पुलाच्या बाजूला पडली असल्याचे आढळून आल्यानंतर काही नागरिकांनी पोलिसांना कळवले. 

वाटेतच झाला मृत्यू 

योगेश राऊतला तातडीने जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. परंतु  जखम खाेलवर असल्याने त्याला तातडीने परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. मात्र झरीच्या ज़वळ असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
 

बातम्या आणखी आहेत...