आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जोडभावी पेठेत अज्ञात कारणावरून तरुणाचा दगड, विटांनी ठेचून खून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जोडभावी पेठेतील पिठाच्या गिरणीच्या बोळात एका पंचविशीतील तरुणाचा दगड, विटा आणि फरशीने खून करण्यात आला आहे. खून कोणी केला आणि त्याचे कारण काय हे अद्याप पुढे आले नाही. ही घटना बुधवारी सकाळी उघड झाली. सागर प्रकाश सरवदे, वय २५, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

 

खुनाची ही घटना १ जानेवारी रोजी रात्री ११.३० ते २ जानेवारी रोजी सकाळी ७ या दरम्यान घडली. याबाबत आई निर्मला प्रकाश सरवदे (वय ५२) यांनी जोडभावी पेठ पोलिसात अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, मी, नवरा प्रकाश सरवदे, दोन मुली, मुलगा सागर असे आम्ही चाळीस वर्षांपासून मुंबईला राहतो. माझा मुलगा सागर हा तेथे गणेश हॉलमध्ये काम करीत होता. तीन महिन्यांपूर्वी चुलत्याचे निधन झाल्याने आम्ही सोलापूरला घरी आलो होतो. या कालावधीत नवरा आजारी पडल्याने आम्ही सोलापुरात राहत होतो. मुलगा सागर हा मार्केट यार्ड येथे हमालीचे काम करीत होता. तो दररोज पहाटे पाचच्या सुमारास कामावर जात असे व सकाळी दहा वाजता परत येत असे. आम्ही सगळे बुधवारी मुंबईला कामानिमित्त जाणार होतो. 

 

एक जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सागर हा घरी आला. रात्री दहा वाजता जेवण करून आम्ही घरात बोलत बसलो होतो. सकाळी यार्डात कामाला जाऊन २०० - ३०० रुपये आणतो, आपल्याला मुंबईला जाताना खर्चाला लागतील, असे म्हणून रात्री साडेअकरा वाजता दुसऱ्या खोलीत झोपायला गेला. मी, नवरा, दोन मुली दुसऱ्या खोलीत झोपलो. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास माझ्या बहिणीच्या मुलीने आमच्या घराचा दरवाजा जोरजोरात ठोठावला व सागरला मारून टाकले आहे, त्याच्या डोक्यात दगड घातले आहेत, असे सांगितले. मी घाबरून खोलीत पाहिले, मुलाचा बिछाना तसाच पडला होता. आम्ही पिठाच्या गिरणीजवळ गेलो असता तेथे रोडवर माझा मुलगा सागर हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याचा चेहरा रक्ताने माखला होता. डोक्याला व चेहऱ्याला रक्त होते. डोक्याजवळ मोठे दगड, विटा, फरशीचे तुकडे होते. पोलिसांनी त्यास सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. त्यास तपासले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अज्ञात इसमाने, अज्ञात कारणाने सागरचा खून केेल्याची फिर्याद दाखल झाली आहे.