आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून 3 बोअरमध्ये टाकले, दारू पाजून केला खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर : एका वीसवर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा खळबळजनक प्रकार लातूर तालुक्यातील मुरूड येथे घडला आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे आणि त्याचा मोबाइल तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या बोअरमध्ये टाकण्याचा क्रूर आणि विकृतपणाही आरोपींनी केला आहे.


मुरूड येथील कृष्णा बबन पांचाळ (२०) हा तरुण गावातीलच सचिन ऑटोमोबाइल्समध्ये कामाला होता. दुकानाचे मालक सचिन गायकवाड (रा. गुंफावाडी, ता. लातूर) याच्याशी त्याचा अर्थिक देवाणघेवाणीवरून वाद झाला होता. त्यातूनच सचिनने काही मित्रांच्या मदतीने ७ दिवसांपूर्वी कृष्णाला पार्टी देण्याच्या निमित्ताने घरातून बोलावून घेतले. नंतर त्याला उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर, येरमाळा येथे फिरवले. त्याला दारू पाजली. कृष्णा नशेत असतानाच सचिन शिवाजी गायकवाड (३५, रा. गुंफावाडी), संदीप गायकवाड (रा. गुंफावाडी), शुभम इंगळे, आकाश शिंदे, संदीप समुद्रे (तिघे रा. मुरुड) या पाच जणांनी त्याचा गळा आवळून खून केला. आपण पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी कृष्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अत्यंत क्रूर मार्ग निवडला. पाच जणांनी मिळून कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे कुणाच्या नजरेत पडू नयेत यासाठी तावरखेडा (ता. उस्मानाबाद) या गावाच्या शिवारात असलेल्या शेतांमधील बोअरमध्ये टाकले. तसेच त्याचा मोबाईल, कपडे असे साहित्यही बोअरमध्ये टाकले.


दुसरीकडे सात दिवसांपासून कृष्णा बेपत्ता असल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. तो ज्या दुकानात काम करायचा त्याचा मालक सचिनलाही विचारणा केली. परंतू त्याने आपण त्याला पाहिलेच नसल्याचे सांगत अंग झटकले. मात्र कृष्णा गायब होण्यापूर्वी त्याला शेवटचा कॉल सचिन गायकवाडचाच आला होता. आणि त्यानेच कृष्णाचे अपहरण करून त्याचे काही बरेवाईट केल्याची तक्रार पांचाळ कुटुंबियांनी मुरूड ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी सचिनवर नजर ठेवली. त्याच्या हालचाली आणि वर्तणूक संशयास्पद असल्याचे आढळल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याची पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता त्याने मित्रांच्या मदतीने कृष्णाचा खून केल्याची कबुली दिली. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून बोअरमध्ये टाकल्याचेही सांगितले.

सचिनच्या दुकानासमोरची वाहने पेटवली
दरम्यान, सात दिवसांपासून कृष्णा पांचाळ गायब असून त्याला सचिन गायकवाडच जबाबदार असल्याचे सांगत पांचाळ कुटुंबियांनी शुक्रवारी सचिनच्या ऑटोमोबाइल्स समोरच्या गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक दोन वाहनांना आगही लागली. पोलिसांनी मध्यस्थी करीत पांचाळ कुटुंबियांना थांबवले. त्यानंतर पोलिसांनी खुनाच्या घटनेचा उलगडा केला.

खुनाच्या कारणाबद्दल मतांतरे
दरम्यान, सचिन गायकवाडने आपल्याच दुकानात काम करणाऱ्या कृष्णाचा खून का केला याबद्दल वेगवेगळी माहिती समोर येत आहे. सचिनने आपल्या कबुलीजबाबात अर्थिक देवाण घेवाणीवरून खून केल्याचे म्हटले आहे. तर त्याच्या सथीदारांनी नवीन दुकान घेण्याच्या कारणावरून सचिन आणि कृष्णाशी वाद झाल्यामुळे खून केल्याचे म्हटले आहे. पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करीत असून बोअरमध्ये टाकलेले मृतदेहाचे तुकडे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...