माहेरी पत्नीला घेण्यास गेलेल्या बसचालकाची हत्या; प्रियकराच्या मदतीने पत्नीने रचला हत्येचा कट
विवाहानंतर पहिल्याच रक्षाबंधनासाठी माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या पतीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक
-
अकोला- विवाहानंतर पहिल्याच रक्षाबंधनासाठी माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या पतीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दर्यापूर-दहीहंडा मार्गावरील जैनपूर फाट्याजवळ शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. धम्मपाल नामदेव वानखडे ( वय २८, रा. वल्लभनगर, अकोला) असे पतीचे नाव असून, ते अकोल्यात राज्य परिवहन महामंडळामध्ये बस चालक आहेत.
अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असून, प्रियकराच्या मदतीने मृतकाच्या पत्नीनेच पतीची हत्या केली असल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे.सागर मनोहरसिंह कोवाल (रा. भामोद ता. येवदा) व मृतकाची पत्नी सुवर्णा धम्मपाल वानखडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सागर याचे गावातच राहणाऱ्या सुवर्णा हिच्यासोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही महिन्यांपूर्वीच सुवर्णाचा मृतक धम्मपालसोबत विवाह झाला होता. घटनेच्या वेळी सुवर्णा पतीसह भामोद येथे रक्षाबंधनासाठी आली होती. दरम्यान धम्मपाल हा आपल्याला दुचाकीने (एमएच ३०/ व्ही १८६६) घ्यायला येत असल्याची माहिती सुवर्णाने आपला प्रियकर सागरला दिली. धम्मपाल सासुरवाडीत पोहोचणार तोच जैनपूर फाट्यावर सागरने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर झालेल्या झटापटीत सागरही जखमी झाला होता. पोलिस तपासात धम्मपालची हत्या प्रेमसंबंधातून झाल्याची बाब उघड होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींना अटक केली. आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सायंकाळी उशिरा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा छडा येवदा पोलिस ठाण्याचे ठाणेदार नितीन चरडे, दुय्यम ठाणेदार गजानन चांभारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला.पत्नी व प्रियकराला अटक; तपास सुरू
घटना स्थळावरील पुरावे, कॉल डिटेल्सच्या आधारे व मिळालेल्या गुप्त माहितीवरून तपास करीत मृतकाची पत्नी व तिचा प्रियकराला अटक केली आहे. तपासात त्यांनीच हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील कारवाई सुरू आहे. नितीन चरडे, ठाणेदार, येवदा