प्रेमप्रकरणातून तरुणीचा भुसावळमध्ये चाकूने खून

दिव्य मराठी

Apr 15,2019 12:09:00 PM IST

भुसावळ - शहरातील लोणारी हॉल परिसरातील हुडको कॉलनीमध्ये घरकुलांजवळ रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास प्रेम प्रकरणातून एका तरुणीवर चाकूने सपासप वार केल्याने तिचा मृत्यू झाला. संशयित तरुणास पाेलिसांनी तातडीने अटक केली आहे. प्रीती ओंकार बांगर (वय २२) असे मृत तरुणीचे नाव आहे.


नगर पालिकेने बांधलेल्या घरकुलात रहात असलेली प्रीती ओंकार बांगर (वय २२) या तरूणीवर रविवारी रात्री नऊला प्रवीण विष्णू इंगळे (वय २७. रा. राहुल नगर, भुसावळ) याने प्रेमप्रकरणातून चाकूने वार केले. अचानक वार झाल्यामुळे भांबावलेल्या जखमी तरुणीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाजूच्या तायडे यांच्या घरात आश्रय घेतला. मात्र प्रवीणने प्रीतीला घराच्या बाहेर काढून तिच्यावर पुन्हा चाकूने जाेरदार वार केले. यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. काही वेळातच तिची प्राणज्याेत मालवली.

या थरारक प्रकार परिसरातील काही लाेकांनी पाहिला. त्यांनी तातडीने पाेलिसांना माहिती दिली. घटनेबाबत माहिती मिळताच डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक बाबासाहेब तांबे आणि पोलिस कर्मचारी हुडकाे काॅलनीमध्ये दाखल झाले. पोलिसांना पाहून पळणाऱ्या अाराेपी प्रवीणला मोहम्मद जुबेर शेख या पोलिस कर्मचाऱ्याने अर्धा किलोमीटर पाठलाग करून पकडले. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हुडको कॉलनी परिसरात या प्रकाराने भीतीचे वातावरण आहे.

X