आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातउसने दिलेले पैसे परत मागितल्याने युवकाचा केला खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जानेफळ- हातउसने दिलेले दोन हजार रुपये मागितले म्हणून पाच व्यक्तींनी मिळून एका २६ वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा येथे शुक्रवार, २८ डिसेंबरच्या रात्री घडली. अक्षय देविदास जाधव असे मृतकाचे नाव आहे.याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल हाेताच पाचही आरोपी फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

 

मृतक अक्षय जाधव याने गणेश भिका ठक याला दोन हजार रुपये हातउसने दिले होते. बऱ्याच दिवसांपासून अक्षय हा गणेशकडे पैशाची मागणी करत होता.घटनेच्या दिवशी अक्षयने गणेशला पैशाची मागणी केली. तेव्हा त्याने तुला पैसे घरी आणून देतो, असे म्हटले व थोड्या वेळाने गणेश भिका ठक, किसना भिका ठक, ज्ञानेश्वर सुपा हिरडकर, गोपाल उकंडा ठक ,गजानन उकंडा ठक हे अक्षय च्या घरी येऊन तू कशाचे पैसे मागतो, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.गंभीर जखमी झाल्याने अक्षयला जानेफळ येथील खासगी रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी तपासणी अंती अक्षयला मृत घोषित केले.

 

पूजाचेही डोके फोडले
ही घटना घडल्यानंतर पूजा गोविंद राठोड हीसुद्धा जखमी अवस्थेत दवाखान्यात आली होती. तिलाही उपरोक्त पाच व्यक्तींनी मारहाण केली. डोक्यात दगड मारल्याने तिच्या डोक्यातून रक्तस्राव झाला होता. मारहाण करताना आजोबा तिथे आले. तेव्हा त्यांना पाहून हे पाचही जण पळून गेले.तिलाही अक्षयने मागितलेल्या पैशाच्या कारणावरून मारहाण केल्याचे राजू राठोड यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

आरोपींचा शोध सुरू
मृतक अक्षय जाधव याने उसने दिलेले दोन हजार रुपये मागितले म्हणून पाच आरोपींनी संगनमताने अक्षयला जिवे मारले. अक्षयचा मामा राजू मदन राठोड यांच्या तक्रारीवरून पाच आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास ठाणेदार गौरीशंकर पाबळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक राजू राऊत व बीट जमादार शरद बाठे करीत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...