आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वैजापूर- घरगुती भांडणामुळे दोन मुलांना सावखेडगंगा (ता. वैजापूर) येथील विहिरीत ढकलून ठार मारणाऱ्या पित्याला औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखा व वीरगाव पोलिसांच्या पथकाने शिताफीने गल्लेबोरगाव (ता. कन्नड) येथे पकडून गजाआड केले. संतोष कचरु वाळुंजे ( ४०) असे त्याचे नाव आहे. वैजापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याला ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सावखेडगंगा शिवारात शनिवारी बापूसाहेब पवार यांच्या शेतातील विहिरीत तीन ते पाच वर्षे वयोगटातील दोन मुलांचे मृतदेह आढळून आले होते. एका मुलाच्या शर्टवर नगर येथील प्ले ग्रुप शाळेचा लोगो असल्याने पोलिसांनी नगर पोलिसांच्या मदतीने तपास केला. पण ती मुले त्या शाळेतील नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली वीरगाव पोलिस ठाण्याचे एपीआय हरीश बोराडे, पोलिस नाईक दिनेश दांडगे, संतोष सोनवणे, शिवनाथ सरोदे, बाबासाहेब धनुरे, हेड कॉन्स्टेबल आर.एस. कासोदे, सुखदान, महेश बिरुटे, चाल गायकवाड यांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली.
यातील एका पथकाने घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेल्या ऊसतोड कामगार व अन्य वस्त्यांची तपासणी केली. त्यावेळी एक व्यक्ती दोन दिवसांपूर्वी सराला बेट येथे दोन मुलांसोबत मुक्कामाला असल्याची माहिती मिळाली. ती व्यक्ती स्वयंपाकीचे काम करत असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी गल्लेबोरगाव येथील हॉटेलांची तपासणी केली. त्यावेळी संतोष हा गल्लेबोरगाव येथील हॉटेल गणराजमध्ये काम करत असून तो पाच सहा दिवसांपासून कामावर आला नसल्याचे समजले. त्यावरुन पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी शिताफिने संतोषला ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेमध्ये त्याची विचारपूस केली असता सततची घरगुती भांडणे, पैसा नसणे आदी कारणांमुळे मुलांना विहिरीत ढकलून मारल्याची कबुली संतोषने पोलिसांना दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.