आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
> 27 वर्षांनंतर आलेल्या मौनी अमावास्येच्या मध्यरात्रीच झाली हत्या
> नरबळीचा प्रकार असल्याची गावकऱ्यांनी व्यक्त केली शक्यता
> सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून तयार केले संशयिताचे रेखाचित्र
जळगाव/चोपडा- चहार्डी (ता.चोपडा) येथील मंगेश पाटील या विद्यार्थ्याचा उजवा पाय मंगळवारी चहार्डी गावामध्ये आढळला होता. हा पाय एक दिवस आधी म्हणजे सोमवारी मध्यरात्रीच कुऱ्हाड किंवा अन्य शस्त्राने आघात करून तोडला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. बुधवारी मंगेशचा पाय, इतर हाडांचे तुकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले होते.
डीएनए चाचणीसाठी नमुने घेतले असून ते धुळे व नाशिकच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. तसेच गावातून सीसीटीव्हीचे फुटेज घेऊन त्यावरून एका भिक्षुकाचे रेखाचित्र तयार केले आहे. दरम्यान, सोमवारी (दि.4) 27 वर्षांनंतर मौनी अमावास्येचा योग आला होता. या अमावास्येला अनेक अंधश्रद्धा पाळल्या जातात. त्यामुळे या प्रकरणात नरबळीचा प्रकार झाल्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मंगेश पाटील (वय 12) याचे संपूर्ण शरीर अद्याप मिळून आले नाही. उजव्या पायानंतर काही हाडे मिळून आली. त्यावरून मंगेशची ओळख पटली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी बुधवारी सकाळी 7 वाजता पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे हे चहार्डी येथे गेले होते. शिंदे यांनी स्वत: गावात व जंगल परिसरात फिरून माहिती घेत होते. तसेच मंगेशचा पाय तसेच इतर हाडांचे तुकडे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले.
नरबळी असल्याच्या या आहेत शक्यता
> 2 रोजी अपहरणानंतर 4 रोजी अमावास्येच्या दिवशी रात्री मंगेशचा खून करण्यात आला.
> मंगेश धार्मिक असल्याने कुठेही भजन, कीर्तनासाठी जात होता. नेमक्या त्याच्या याच स्वभावाचा फायदा मारेकऱ्याने घेतला असावा.
> मंगेशचे कुटुंबीय मोलमजुरी करतात. मंगेशचा खून करून कोणालाही आर्थिक किंवा इतर कोणताही फायदा होण्याची शक्यता नव्हती.
> मंगेश व कुटुंबीयांशी कोणाचे वैर नव्हते. त्यामुळे रागाच्या भरात किंवा सूड उगवण्यासाठी कोणी असे करण्याचे कारण नाही.
> शरीराचे तुकडे करून अघोरी कृत्य अंधश्रद्धेतून होत असल्याचे अनेक उदाहरणे समोर आहेत.
कॅमेऱ्याच्या फुटेजवरून संशयाची सुई भिक्षुकाकडे
पोलिसांनी गावातील दिनेश ज्वेलर्स या दुकानावर बसलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज बुधवारी ताब्यात घेतले. 2 रोजी दुपारी चहार्डीतील शिवाजीनगरात एक भिक्षुक 2 तास भिक्षा मागत होता. हा भिक्षुक दुपारी 12 वाजून 1 मिनिटाने दिनेश ज्वेलर्समध्ये गेला होता. बाहेर आल्यानंतर त्याने जारमधून पाणी पिल्याचे दिसून येते आहे. पाणी पीत असताना तो संशयास्पद हालचाली करीत होता. त्याच्या पाठीवर एक मोठी पिशवीही होती. याच भिक्षुकाने मंगेशचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त हाेत आहे. फुटेजवरून पोलिसांनी भिक्षुकाचे रेखाचित्र तयार केले आहे. त्यावरून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या शिवाय नागरिकांनी मारेकऱ्याविषयी माहिती दिली तर त्यास रोख बक्षीस देण्याची घोषणा पोलिस अधीक्षक शिंदे यांनी बुधवारी केली आहे.
मारेकऱ्याचा कसून शोध सुरू
मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी कसून प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. गावकऱ्यांकडूनही माहिती घेतली जाते आहे. लवकरच मारेकरी सापडेल, अशी अपेक्षा आहे.
- दत्ता शिंदे, पोलिस अधीक्षक
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा.. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून पोलिसांनी तयार केले संशयिताचे रेखाचित्र
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.