आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण,अॅट्राॅसिटी मागणीसाठी मुस्लिमांचा तिरंगा घेऊन मोर्चा, महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुस्लिमांमधल्या पन्नास जातींना आरक्षण द्यावे, अॅट्राॅसिटी कायद्याचे संरक्षण मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी मुस्लिम समाजातील नागरिकांनी रविवारी पुण्यात मूक मोर्चा काढला होता. कोणताही पक्ष, संघटना अथवा धर्माचा झेंडा न घेता तिरंगा ध्वज हाती घेऊन माेर्चेकरी सहभागी झाले हाेते. 


गोळीबार मैदानापासून सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा मोर्चा विधान भवनापर्यंत नेण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधीने मागण्यांचे निवेदन स्वीकारले. बुरखा घातलेल्या महिलाही माेठ्या संख्येने माेर्चात सहभागी झाल्या हाेत्या. या मोर्चाला इतर जाती-धर्मातल्या काही संघटनांनीही पाठिंबा जाहीर केला होता. पक्ष-संघटनाविरहित मोर्चा काढण्यासाठी मुस्लिम मूक महामोर्चा समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. 


मुस्लिमांमधल्या शैक्षणिक व सामाजिक मागास असणाऱ्या ५० जातींना ५ टक्के आरक्षण देणारा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने २०१४ मध्ये काढला होता. या अध्यादेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने अंतरिम निर्णय देत या अध्यादेशाला स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली. मात्र संबंधित रिट याचिका अद्याप उच्च न्यायालयात अंतिम निर्णयासाठी प्रलंबित आहे. 


संबंधित मुस्लिम आरक्षणाच्या मागणीला राज्यघटनेचा आधार आहे. राज्य सरकारने आरक्षणाच्या अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात करणे आवश्यक होते. ते न झाल्याने मुस्लिमांमध्ये नैराश्य पसरले आहे. सरकार मुस्लिमांबाबत दुजाभाव करत असल्याची भावना यामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने पाच टक्के आरक्षण लागू करावे, या आशयाचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी दिले. महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस या कायद्यात दर दहा वर्षांनी ओबीसी जाती-जमातींचे पुनर्विलोकन करण्याची तरतूद आहे. या तरतुदीचे पालन व्हावे, अशीही मागणीही या वेळी मोर्चेकऱ्यांनी केली. मोर्चाला राज्यभरातून उपस्थिती होती. 


मराठा, ब्राह्मण, जैनांनाही अारक्षण द्या 
- 'सध्या अस्तित्वात असलेले ५२ टक्के आरक्षण वाढवून ते ७० टक्के करण्यात यावे. ब्राह्मण, जैन, शीख, ख्रिश्चन, मुस्लिम, मराठा, धनगर, लिंगायत या सर्वांमधल्या सामाजिक व शैक्षणिक मागासांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा करावा,' अशी मागणी माेर्चेकऱ्यांनी केली. 
- देशभरातल्या झुंडींनी केलेल्या हत्यांमध्ये (मॉब लिंचिंग) ७८ पेक्षा निर्दोष मुस्लिम मारले गेले. या गुन्ह्यातल्या अपराध्यांना फाशी द्यावी. 
- मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डात शासनाने हस्तक्षेप करू नये. 
- वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्यात यावी. 

बातम्या आणखी आहेत...