आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम समाजाला आरक्षणासाठी काँग्रेस कटीबद्ध, मुख्यमंत्र्यांनी नकार दिल्यानंतर थोरात यांची प्रतिक्रिया

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारमध्ये मुस्लिम आरक्षणावरून मत-मतांतरे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी नुकतेच महाराष्ट्र सरकार मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देणार असे म्हटले होते. परंतु, मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी तसा कुठलाही प्रस्ताव नाही असे मंगळवारी स्पष्ट केले. त्यातच आता मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत असे काँग्रेसच्या वतीने सांगितले जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले अद्याप प्रस्ताव नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम आरक्षणाचा कुठलाही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही असे म्हटले. त्याच्या अवघ्या काही मिनिटांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया समोर आली. थोरात यांनी सांगितल्याप्रमाणे, "आम्ही (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस) मुस्लिमांना यापूर्वी सुद्धा आरक्षण दिले होते. परंतु, गेल्या 5 वर्षांमध्ये त्यावर पुढे कारवाई होऊ शकली नाही. तरीही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात मुस्लिम आरक्षणाचे आश्वासन दिले होते आणि त्यावर आम्ही कटीबद्ध आहोत. त्यामुळे, आम्ही ते देणारच आहोत." थोरात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. तरीही यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही ही गोष्ट त्यांनी मान्य केली.

मुस्लिम आरक्षणावर चर्चा झाली नाही, लवकरच चर्चा होणार -थोरात

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाचा प्रस्ताव सध्या नसल्याचे सांगितले ते खरे आहे. कारण, अद्याप त्यावर चर्चा सुद्धा झालेली नाही. लवकरच या विषयावर चर्चा होणार आहे. ही चर्चा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या समितीमध्ये आणि मंत्रिमंडळात होणार आहे. त्यानंतर काही निर्णय होऊ शकतो. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या आठवड्यातच राज्य सरकार मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण देणार असे सांगितले होते. त्यानंतर भाजपने याला विरोध केला आणि मुख्यमंत्र्यांनी तसा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे मंगळवारी स्पष्टीकरण दिले.
 

बातम्या आणखी आहेत...