आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आदळआपट करताहेत, त्यांनी ताकद वाया घालवू नये' - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुस्लिमांना आरक्षण देणारच : काँग्रेस; हा मुद्दा आमच्यासमोर आलेला नाही : उद्धव; आघाडीत मतभेद : देवेंद्र

मुस्लिम आरक्षणाबाबत आमच्यासमोर कोणताही मुद्दा आलेला नाही. जेव्हा तो मुद्दा समोर येईल तेव्हा सर्व बाजू तपासून निर्णय घेतला जाईल. मुस्लिम आरक्षणाबाबत मुख्यमंत्री किंवा शिवसेना म्हणून आम्ही कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधान भवनात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच मुस्लिम आरक्षणावरून जे आदळआपट करीत आहेत त्यांनी ताकद वाया घालवू नये, अशी टीकाही त्यांनी नाव न घेता भाजपवर केली. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र मुस्लिमांना आरक्षण देणारच, अशी भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीत या मुद्द्यावरून मतभेद असल्याचे समोर येत आहे.

मुस्लिम आरक्षणाबाबत मुख्यमंत्री किंवा शिवसेना म्हणून आम्ही कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत अजून कोणताही निर्णय शिवसेनेने घेतलेला नाही असे वक्तव्य केले. या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील वरिष्ठ मंत्री आणि काँग्रेस नेत्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, काँग्रेसने जाहीरनाम्यात मुस्लिमांना आरक्षण देऊ असे म्हटलेले आहे. महाविकास आघाडी एका समान कार्यक्रमानुसार एकत्र आलेली आहे. त्यामुळे मुस्लिमांना आरक्षण देण्यास आम्ही बांधील आहोत.

नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री - न्यायालयानेच मुस्लिमांना आरक्षण द्यावे असे सांगितले आहे, परंतु फडणवीस सरकारने ते दिले नाही. ते आम्ही देणारच आहोत.

बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष - आम्ही (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस) मुस्लिमांना यापूर्वीसुद्धा आरक्षण दिले होते. परंतु, गेल्या ५ वर्षांत पुढे कारवाई होऊ शकली नाही. तरीही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जाहीरनाम्यात मुस्लिम आरक्षणाचे आश्वासन दिले होते आणि त्यावर आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे आम्ही ते देणारच.'

आरक्षण देणार नाही, हे ठाकरे यांनी सभागृहात सांगावे : फडणवीस

धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या दोन्ही सभागृहांत येऊन मुस्लिमांना आरक्षण देऊ शकत नाही, असे हिमतीने सांगावे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही. सरकार येऊन १०० दिवस झाले तरी आघाडीतील घटक पक्ष एकमेकांना समजावू शकलेले नाहीत. 

अयोध्येला जाणारच, सीएएबाबत मंत्र्यांची समिती

ठाकरे सरकारने मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याने अयोध्येतील संत नाराज आहेत. याबाबत विचारता ठाकरे म्हणाले, श्रद्धा आणि भावना आहे म्हणून मी अयोध्येला जाऊन श्रीरामांचे दर्शन घेणार आहे. देवाचे दर्शन घेण्यात राजकारण कसले? राष्ट्रवादी व काँग्रेससोबत युती केली म्हणून देवाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. देव हा देव असतो. एनआरसी-एनपीआरबद्दल दिशा ठरवण्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांची समिती नेमण्यात येणार आहे. सीएए एनआरसीमुळे राज्यातील एकाचेही नागरिकत्व हिरावू देणार नाही.

कर्जमाफीची यादी तयार, आचारसंहितेची अडचण

ठाकरे म्हणाले, कर्जमाफीची १० लाख शेतकऱ्यांची यादी तयार आहे.  उर्वरित यादी लवकरात लवकर जाहीर होईल. काही ठिकाणी निवडणूक आचारसंहिता आहे. गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, नंदुरबार आणि नाशिक यांची पाच लाख शेतक‍ऱ्यांची यादी तयार पण आचारसंहितेमुळे ती यादी लावू शकलेलो नाही. पंतप्रधान फसल विमा योजना का फसली? फसल शब्द मराठी की हिंदी माहीत नाही, पण ती का फसली? पंतप्रधानांची शेतक‍ऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना आहे, कशी चालली आहे ते बघत आहोत.

बातम्या आणखी आहेत...