Home | National | Delhi | Muslim woman should have entry in masjid

मुस्लिम महिलांना मशिदींत नमाजपठणाची परवानगी देण्याबाबत केंद्र सरकारला नोटीस

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 17, 2019, 09:07 AM IST

कॅनडातही त्यांना मशिदीत नमाजपठणाची परवानगी दिली गेली आहे.

 • Muslim woman should have entry in masjid

  नवी दिल्ली- सबरीमाला मंदिराप्रमाणे मुस्लिम महिलांनाही देशभरातील मशिदींमध्ये जाऊन नमाजपठणाची परवानगी देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला नोटीस बजावली. तसेच याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड व वक्फ बोर्डानेही चार आठवड्यांत खुलासा सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.


  याबाबत दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, सबरीमाला मंदिरप्रकरणी निर्णय दिल्यामुळेच आम्ही या याचिकेवर सुनावणी करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनात्मक पीठाने गतवर्षी २८ सप्टेंबरला ४:१ च्या बहुमताने निर्णय देऊन प्रत्येक वयोगटातील महिलांना सबरीमाला मंदिरात प्रवेशाचा मार्ग खुला केला होता. तसेच १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेशावरील बंदी म्हणजे लैंगिक भेदभाव असल्याचे स्पष्ट केले होते. याच निर्णयाच्या आधारे महाराष्ट्रातील यास्मिन व जुबेर अहमद पीरजादा या दांपत्याने ही याचिका दाखल करून मुस्लिम महिलांनाही मशिदींत नमाजपठणाची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

  सर्वोच्च न्यायालय लाइव्ह - सबरीमाला निकालामुळे ही सुनावणी

  न्यायमूर्ती बोबडे : मंदिर किंवा मशिदीचे संचालन थर्ड पार्टीतर्फे केले जाते. यात सरकार आले कसे?
  याचिकाकर्ते : मशिदींनाही सरकारकडून अनुदान मिळते.

  या वेळी न्यायमूर्ती बोबडे व अब्दुल नजीर यांच्या पीठासमोर याचिकाकर्त्यांचे वकील आशुतोष दुबे यांनी विविध युक्तिवाद मांडले. वाचा लाइव्ह कार्यवाही...

  अॅड. दुबे : देशात मुस्लिम महिलांना मशिदीत नमाजपठणाची परवानगी नाही. हा प्रकार त्यांच्या अधिकारांचे हनन करणारा आहे. महिलांच्या समानतेच्या माैलिक हक्काचे रक्षण करताना सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी प्रत्येक वयोगटाच्या महिलांना सबरीमाला मंदिरात प्रवेशाची परवानगी देण्याचा निर्णय दिला होता.
  न्यायमूर्ती : तुम्ही तुमच्या मागणीसाठी केवळ सबरीमाला मंदिर प्रकरणाच्या निर्णयाला आधार बनवले आहे. समानतेचा हक्क नाॅन स्टेट अॅक्टर म्हणजे सरकारच्या इतर लोकांकडूनही घेतला जाऊ शकतो काय?

  अॅड. दुबे : नाही; परंतु मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेश दिला जात नाही व पोलिसही त्यांना नमाजपठणासाठी सहकार्य करत नाहीत.

  न्यायमूर्ती नजीर : मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात तर महिला जाऊ शकतात.
  अॅड.दुबे : तेथे परवानगी आहे; परंतु बहुसंख्य मशिदींमध्ये महिलांना प्रवेशबंदी आहे.
  न्यायमूर्ती नजीर : मक्का-मदिनेत महिला नमाजपठण करू शकतात?
  अॅड. दुबे : महिलांना मक्केतील एका मशिदीत प्रवेश दिला जातो. कॅनडातही त्यांना मशिदीत नमाजपठणाची परवानगी दिली गेली आहे.

Trending