आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडला मुस्लिमांची वंचित बहुजन आघाडीकडे पाठ ; मुस्लिमबहुल वस्त्यांतून अशोक चव्हाण यांनाच मताधिक्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे धुळीला मिळवले. वंचितने असे धोबीपछाड मारली की, राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री, आजी माजी प्रदेशाध्यक्षासह अनेक दिग्गज धारातीर्थी पडले. परंतु ज्या उद्देशाने प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमला सोबत घेऊन वंचितची मोट बांधली तो उद्देश मात्र सफल होऊ शकला नाही. चित्र असेच कायम राहिले तर आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितांना सत्तेपर्यंत पोहोचता येणे कठीणच आहे. 


दलित आणि मुस्लिम मते ही काँग्रेसच्या सत्तेचा मुख्य आधार राहिली. २०१४ च्या निवडणुकीत पहिल्यांदा मोदींना हे समीकरण बदलण्यास यश आले. मोदींच्या पाच वर्षांच्या राजवटीनंतर पुन्हा सत्ता परिवर्तन होईल व काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल असा आशावाद काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला  होता. परंतु प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने आघाडीच्या स्वप्नावर पाणी फेरले. 


वंचितची मोट बांधली : ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची मोट बांधली. त्यात समाजातील सर्वच वंचित घटकांचा समावेश केला.  एमआयएमलाही सोबत घेतले. दलित आणि मुस्लिम मते एकत्र आली तर काँग्रेसचा जनाधार मोडीत निघेल, इतर वंचित समाजातील मते त्यात आली तर वंचितला राज्यात काही जागा मिळतील असा त्यांचा उद्देश होता. वंचितच्या उमेदवारांना मिळालेली मते पाहता आंबेडकर दलित व वंचितांची मते एकत्र करण्यात यशस्वी झाले. परंंतु औरंगाबाद वगळता इतर मतदारसंघांत मात्र मुस्लिम मतदारांनी वंचितकडे पाठ फिरवली. नांदेड लोकसभा मतदार संघाचा विचार केला तरी हे चित्र स्पष्ट झाले. अशोक चव्हाण यांना ४ लाख ४२ हजार १३८ मते मिळाली. शहरातील देगलूर नाका, मिल्लत नगर, पीर बुऱ्हाण नगर, निझाम काॅलनी असा मुस्लिम बहुल भाग आहे त्या नांदेड उत्तर मतदार संघात चव्हाणांना ३० हजाराहून अधिक मताधिक्य आहे. राज्यात एका विधान सभा मतदार संघात मिळालेले हे सर्वाधिक मताधिक्य आहे. मुस्लीम मते जर काँग्रेसला मिळाली नसती तर हे मताधिक्य मिळणे शक्य नव्हते. मुस्लिमांशिवाय वंचित समाजातील मते प्रा. यशपाल भिंगे यांना पडल्याने अशोक चव्हाण पराभूत झालेत. 

 

तर विधानसभा निवडणूक लढणेही कठीण 
वंचित आघाडी विधानसभेतही राहणार आहे. तथापि लोकसभेप्रमाणेच जर मुस्लिम मतदार एमआयएमच्या सोबत गेले नाही तर वंचित आघाडी केवळ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मार्गातील अडथळा ठरेल, सत्तेच्या चाव्या त्यांच्या हाती येणार नाहीत, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

 

लोक ओवेसींना नेता मानत नसल्याचे दिसते
औवेसींना आपला नेता मानण्यास मुस्लिम समाज अजून तयार नाही हे दिसून आले. औरंगाबाद, परभणीत काही मते वंचितकडे गेली. परंतु मुस्लिमांची मते घेऊन सत्तेपर्यत पोहोचण्याचा जो प्रकाश आंबेडकरांचा मनसुबा होता तो यशस्वी झाला नाही. 
मुन्तजीबोद्दीन, उर्दू पत्रकार, नांदेड 
 

बातम्या आणखी आहेत...