आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलण्याचा वेडेपणा केलाच पाहिजे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रियांच्या ‘माणूसपणाची वाटचाल’ सातत्याने अधोरेखित करू पाहणाऱ्या ‘मिळून साऱ्या जणी’ मासिकाच्या ३० व्या वर्धापनदिनी अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ती अशा बहुआयामी ओळखीच्या नंदिता दासने मुलाखतीच्या निमित्ताने मांडलेले विचार अंतर्मुख करणारे आणि अस्वस्थही करणारे होते. विशेषत: प्राप्त परिस्थितीत देश ज्या पद्धतीने ‘इधर’ या ‘उधर’ अशा गटात वाटला जात आहे, त्या पार्श्वभूमीवर नंदिताने साधलेला संवाद महत्त्वाचा वाटला. दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी या संवादाची सूत्रे सांभाळली… नंदिता दास हे नाव उच्चारले, की ‘सिनेतारका’ यापलीकडचे बरेच काही समोर येते. चित्रपट अभिनेत्री नंदिता, हे तिचे एक रूप आहे किंवा तिच्या व्यक्तिमत्वाचा तो एक पैलू आहे. तिनं स्वत:च उल्लेख केला त्याप्रमाणे ती काही मेनस्ट्रीम सिनेमाची हीरोइन नाही आणि ते तिचं गन्तव्यस्थानही नाही. मला नेहमी ‘चित्रपट’ हे माध्यम म्हणून महत्त्वाचं वाटतं कारण त्यातून एकाचवेळी आपण लक्षावधी मनांशी संवाद साधू शकतो. आपल्याला जे सांगावंसं वाटतं, त्याची नेमकी मांडणी करून, या माध्यमाद्वारा ती पोचवता येते. मी व्याख्यानं देते, सदरलेखन करते..पण त्याचा श्रोता-वाचक मर्यादित असतो. भाषेच्या, स्थळाच्या, प्रदेशाच्या आणि आकलनाच्याही सीमा असतात.(याचा अर्थ हे कमी महत्त्वाचं आहे, असे अजिबात नाही, हे तिनं आवर्जून नोंदवलं) चित्रपट माध्यम मात्र या मर्यादांच्या पलीकडे जाऊन सर्व भाषांच्या, प्रांतांच्या, वयाच्या, जाणिवांच्या आणि आकलनाच्याही सीमा पुसून पोचू शकते, याचा अनुभव मी अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणून घेतला आहे, असं ती म्हणाली. ‘फिराक’ आणि ‘मंटो’ चे अनुभव या माध्यमसामर्थ्याचा नव्यानं परिचय करून देणारे ठरले, असं ती म्हणाली. चित्रपट माध्यम अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणून हाताळताना, मला चित्रपटाची कथा सर्वांत महत्त्वाची वाटते. कथेवर योग्य काम झाले, की चित्रपट आशयघन होण्याच्या शक्यता वाढतात, याचा उल्लेख करत नंदिताने स्वत:चा चित्रपटविषयक प्रवासही उलगडला. काही व्यावसायिक चित्रपटांत काम करण्याचा अनुभव घेतल्यावर तिथे उघडपणे दिसणारी असमानता, भेदभाव, स्टार्सना दिली जाणारी विशेष वागणूक...हे जाणवले. मेन स्ट्रीममधून मला अनेक ऑफर्स होत्या. पण त्यातून फक्त दिसत राहण्यापेक्षा आपल्याला आवडतील त्याच भूमिका स्वीकारून आवडणाऱ्या इतर अनेक गोष्टींसाठी वेळ द्यायचा, हा निर्णय घेणे मला सोपे गेले, असे नंदिता म्हणाली. समकालीनतेवर चित्रपट करायचा म्हटले तर त्यासाठी ‘पडद्या’ची गरजही पडू नये, असा भोवताल आपण अनुभवत आहोत. त्याचीच परिणती ‘फिराक’ आणि ‘मंटो’मधून प्रकट झाली. हे अनुभव मला अनेक अर्थांनी समृद्ध करणारे, शिकवणारे ठरले. दिग्दर्शक म्हणून मला गोष्टीतच रस वाटतो. लेखकाची मूळ कथा काय सांगू पाहतेय आणि दिग्दर्शक ती चित्रभाषेत कशी मांडू पाहतोय, हे मला जाणून घ्यायचे होते. ‘मै चाहती थी के मै अलग अलग कहानियों का हिस्सा बनू’ याच विचारातून मी आजवर काम स्वीकारत आणि करत राहिले आहे, असे ती म्हणाली. माझेही कंडिशनिंग झाले होतेच की..  मुलगी म्हणून जन्माला आल्यापासून आपल्या देशातल्या कुठल्याही कुटुंबात होते, तसे मुलगी म्हणून माझेही कंडिशनिंग झाले होतेच. मी पदवीधर होईपर्यंत त्याच प्रक्रियेत होते. पण त्यानंतर मात्र माझी नजर अधिकाधिक मोकळी, खुली होऊ पाहात होती. मग मी सामाजिक विज्ञान घेऊन पद्वयुत्तर पदवी मिळवली. या दरम्यान खूप वाचन झाले. प्रवास झाला. चळवळींमध्ये काम करण्याचा अनुभव घेतला. सामाजिक संस्थांशी निगडित झाले. लेखन करू लागले. व्याख्याने देऊ लागले. निरनिराळ्या विचारधारा समजून घेण्याचा प्रयत्न केला. हे सर्व सुरू असताना गुजरातमधील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक वातावरणातले बदल पृष्ठभूमीवर होतेच..एक विलक्षण अस्वस्थता दाटून आलेला तो काळ होता. मी ‘आयडेंटिटी क्रायसेस’वर बोलत असे, तेव्हा मला जाणवले की, आपलीही एक लढाई सुरूच आहे की आपल्या कंडिशनिंगविरोधात..मुलगी म्हणून, स्त्री म्हणून प्रत्येक ठिकाणी भेदाभेद आणि असमानता देणाऱ्या आणि ‘माणूसपण’ नाकारणाऱ्या कित्येक सूक्ष्म गोष्टींना मला ‘नाही’ म्हणायचे होते.. मला लिबरेशनचा अर्थ ‘माणूसपणाकडची वाटचाल’ असाच अभिप्रेत आहे, हे या प्रवासात मला समजले.  राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मूलभूत अधिकारांचा अर्थ मला जाणवला आणि हेही उमगले, की स्वातंत्र्याचा अर्थ एखाद्या व्याख्येपुरता नाही. किंबहुना ‘स्वातंत्र्य’ कुठल्याच व्याख्येत, शब्दसमूहात नेमकेपणाने बसवता येत नाही. प्रत्येक व्यक्तीनुसार स्वातंत्र्याची परिभाषा बदलत जाते. ‘फायर’मधली माझी व्यक्तिरेखा घरात डान्स करते, सिगरेटचा झुरका मारून पाहते..लिबरेशनचा तिच्या दृष्टीने एक अर्थ तिला सापडलेला असतो. ‘मंटो’मध्ये मी इतिहासाच्या दारातून वास्तवाकडे पाहण्याचा एक प्रयत्न केला. ‘लिबरेशन’ काही वस्तू नाही, जी कुणी आणून देईल किंवा कुठून मिळवता येईल. प्रत्येक व्यक्तीची माणूसपणाकडे होणारी वाटचाल, हा लिबरेशनचा अर्थ आहे, असे मला वाटते. आपल्या प्रत्येक कृतीतून अशा माणूसपणाकडे आपण छोटी छोटी पावले टाकत राहिले पाहिजे. त्याची परिभाषा प्रत्येकाने स्वत:ची स्वत: ठरवायची आहे. व्याख्या केली, ती संकल्पना जणू कुलूपबंद होते. ती आपण लॉक आणि ब्लॉक करून टाकतो. ते सोयीचे असते आणि सोपेही असते. कुठल्याही गोष्टीला, व्यक्तीला एक ‘लेबल’ लावले, की आपल्याला शांती मिळते कारण मग ‘सोचने की तकलीफ उठाने की जरूरत नही पडती’ अशा शब्दांत या मनोवृत्तीवर नंदिताने मारलेल्या कोपरखळीला टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद मिळाला. हे बदल अविश्वसनीय वाटतात : आपल्याकडे एक झुंड उठते, कुणाला मारून टाकते. त्याला कुणीही विरोध करत नाही आणि दुसरीकडे प्रेम करणाऱ्यांना मात्र एकत्रित विरोध होतो..हे विचित्र आहे. आपल्याकडे सामूहिक हिंसाचाराचे बळी पडतात. त्यावर चर्चा होत नाही. कारवाई दूरच...भीतीच्या अशा गडद सावटाखाली जगत राहणे फार कोंडमारा करते. उजवे काय डावे काय, आता फारसा फरक दिसतच नाही. उदारमतवादाच्या नावाखाली आपल्याच लोकांचा एक गट करून राहणे समाज म्हणून वावरताना मला घातक वाटते. विशिष्ट धर्म, भाषा, वंश, राष्ट्रवाद..हीच आपली ओळख आहे, असे ठसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मग सामूहिक हिंसाचारामागचा तर्क कोणता? नोटाबंदीचे नेमके वास्तव काय, ३७० कलमामागचे मर्म काय...याची स्पष्टीकरणे मिळत नाहीत, असे प्रश्नही नंदिताने उपस्थित केले. आपली बहुसांस्कृतिकता, बहुभाषांचे अस्तित्व, बहुलिपीत्व, बहुधर्मियांचे सहजीवन...याला परंपरा आहे. इतिहास आहे. ही व्यामिश्रता हेच आपले वैशिष्ट्य आहे, हे पुन्हा पुन्हा सांगत राहिले पाहिजे. त्यासाठी फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे संवाद. आपल्याला अस्वस्थ करत राहणारा भोवताल बदलण्यासाठी प्रयत्न करत राहणे, त्यासाठी सतत संवाद साधणे, तो वाढवत नेणे हा कुणाला वेडेपणा वाटत असेल, पण आशावादी राहून असा वेडेपणा पुन्हा पुन्हा करत राहणे, हाच परिवर्तनाचा मार्ग आहे, या नोटवर नंदिताने आपल्या संवादाची सांगता केली.लेखिकेचा संपर्क - ९८८१०९८०४८