नाशिक / नाशकात स्थानिकांच्या मदतीने टाकला मुथूट फायनान्सवर दरोडा; संशयिताची कबुली

यूपीतील गुन्हेगारांचे सहा महिने वास्तव्य, नाशिक कनेक्शन होणार उघड
 

प्रतिनिधी

Jun 25,2019 09:08:00 AM IST

नाशिक - मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दरोडा टाकणाऱ्या सहा जणांच्या टोळीने स्थानिक ‘बाउन्सर’च्या मदतीने सहा महिने वास्तव्य करत दरोडा टाकल्याची कबुली उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगार जितेंद्र विजयबहादूरसिंग राजपूत याने दिल्याची माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत साेमवारी दिली. या दरोड्यातील आणखी पाच संशयित फरार असून ९ पथके त्यांच्या मागावर आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जून रोजी मुथूट फायनान्सवर सशस्त्र सहा जणांनी दरोडा टाकला होता. यामध्ये कंपनीचा कर्मचारी साजू सॅम्युअल यांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर बेछूटपणे गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यानंतर दरोडेखोर फरार झाले. शहर व परिसरातील पोलिसांची नाकेबंदी भेदत सहा दरोडेखोर फरार होण्यास यशस्वी ठरले. मात्र, दुसऱ्या दिवशी संशयितांच्या तीन दुचाकी आशेवाडी रामशेज किल्ला परिसरात आढळून आल्या. याआधारे पोलिसांनी आरटीअोकडून दुचाकी मालकांचे नाव व पत्ते शोधून काढले. दोन दुचाकी मालकांचे पत्ते मिळाल्यानंतर या एकमेव धाग्याच्या आधारे संशयित जितेंद्रसिंग राजपूत (रा. अंबिका रोहाऊस, दिंडोली, सुरत) यास ताब्यात घेतले. हा मछलीशहर जोहनपूर (उ.प्र) मधील सराईत गुन्हेगार आहे. त्याने नाशिकच्या सुभाष गौडच्या मदतीने सख्खा भाऊ आकाशसिंग राजपूत, परमेंदर सिंग, पप्पू ऊर्फ अनुज साहू, आणि गुरू यांच्या मदतीने मुथूट फायनान्स कंपनीवर दरोडा टाकल्याची कबुली दिली. संशयित जितेंद्रसिंग यास न्यायालयात हजर केले असता नऊ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिक कनेक्शन होणार उघड
संशयितांवर मोक्का कारवाई करण्यात येणार आहे. या गुन्ह्यांत आणखी काही संशयितांचा समावेश असण्याची शक्यता आहे. पाच संशयितांच्या मागावर पथक आहे. सर्व अटक झाल्यानंतर आणखी नावे निष्पन्न होणार आहेत. परराज्यातील गुन्हेगारांचे रेकाॅर्ड मागवण्यात आले आहे.
विश्वास नांगरे पाटील, पोलिस आयुक्त

X
COMMENT